१४ नोव्हेंबरला दिसणार सुपरमूनचा अनोखा नजारा

supermoon
येत्या १४ नोव्हेंबरला म्हणजे कार्तिकी पौणिमेदिवशी ऐतिहासिक खगोलिय घटना बघण्यास विसरू नका. या दिवशी २०१६ सालातला सर्वात मोठा चंद्र म्हणजेच सुपरमून पाहता येणार आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात निकट येणार असून तो नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा १४ टक्के मोठा व ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल.

वर्षातल्या सर्वच पौर्णिमांना चंद्र पृथ्वीजवळ येत असतो मात्र त्याच्या अंतरात फरक असतो व त्यामुळे त्याचे तेज व आकारही भिन्न असतात. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच चंद्र १४ नोव्हेंबरला पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येणार आहे. यापूर्वी इतक्या निकट तो १९४८ साली दिसला होता. हा योग या नंतर १८ वर्षांनी पुन्हा म्हणजे २५ नोव्हेंबर २०३४ ला येईल. १४ डिसेंबर २०१६ रोजीही चंद्र पृथ्वीच्या निकट असेल पण त्यावेळी त्याचा आकार व तेज कमी दिसणार आहे. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो, तेव्हा त्याला सुपरमून असे म्हणले जाते.