बिहारमधील मार्कंडेयार्क सूर्य मंदिर

suryamandir
बिहारमध्ये उत्साहात सुरू असलेल्या छटपूजेचा आज शेवटचा दिवस आहे. छट पूजा ही सूर्याला समर्पित आहे. राज्यातील सहरसा पासून ११ किमीवर असलेल्या महिषी प्रखंडच्या कंदाहा येथे देशातील विख्यात १२ सूर्यमंदिरात गणना होत असलेले मार्कंडेयार्क सूर्य मंदिर आवर्जून भेट द्यावे असे आहे. या मंदिराची तुलना कोणार्कच्या सूर्यमंदिराशी तसेच देवार्कच्या सूर्यमंदिराशी केली जाते. या मंदिरातील सूर्य मूर्ती काळ्या पाषाणातली असून तिच्या डोक्यावर मेष राशीचे चिन्ह म्हणजे मेंढा आहे. द्वापार युगात श्रीकृष्णाचा मुलगा सांब याने या मंदिरातील मूर्तीची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. या स्थळाचे प्राचीन काळचे नांव कंचनपूर असे होते.

असे सांगतात की आर्यावर्तात कृष्णपुत्र सांब याने देशातील विविध ठिकाणी बारा राशींच्या प्रतिमा असलेल्या सूर्यमूर्ती स्थापन केल्या आहेत. कंदाहामधील मंदिर त्यापैकीच एक आहे. या मंदिराचे पुननिर्माण पालवंशाच्या राजांनी केले असल्याचे संदर्भ सापडतात. मंदिरातील सूर्य मूर्ती व चौकटीवर असलेली लिपी पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येथे येत असतात. या मंदिराच्या परिसरात एक विहीर असून या विहीरीतील पाण्याने स्नान केल्यास त्वचारोगांपासून मुक्ती मिळते असा भाविकांचा समज आहे. तसेच खर्‍या श्रद्धेने व्यक्त केलेली कोणतीही मनोकामना या मूर्तीच्या दर्शनाने पूर्ण होते असेही सांगितले जाते. पुरातत्त्व विभागाने १९८२ मध्ये हे सुरक्षा स्मारक म्हणून जाहीर केले आहे.

मंदिरात मिळालेल्या ताम्रपटातील मजकुराप्रमाणे ओईनवर वंशाचा राजा नरसिंहदेव याच्या आदेशावरून वंशधर नावाच्या ब्राह्मणाने १३५७ साली या मंदिराचे निर्माण केले आहे.

Leave a Comment