नासाने बनवली जगातील सर्वांत मोठी अवकाशातील दुर्बीण

nasa
वॉशिंग्टन – जगातील सर्वांत मोठी अवकाशातील दुर्बीण अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने तयार करण्याचा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला असून या दुर्बिणीला जेम्स वेब असे नाव दिले आहे. २०१८मध्ये ती अवकाशात कार्यरत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील २६वर्षांपासून कार्यरत असलेल्या हबल या दुर्बिणीची ही दुर्बीण जागा घेणार आहे.

परग्रहावरील जीवसृष्टीचाही वेध या दुर्बिणीद्वारे घेणे शक्‍य होणार असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला आहे. जेम्स वेबची निर्मिती पूर्ण झाली असून, तिच्या काही चाचण्या होणे अद्याप बाकी आहेत. या दुर्बिणीचा मुख्य भाग असल्या प्रायमरी मिररवर तंत्रज्ञांनी नुकताच अंतिम हात फिरवला आहे. ही दुर्बीण कार्यरत झाल्यावर ती ३.५ अब्ज वर्षे पूर्वीच्या घटनांचा वेध घेऊ शकणार आहे. म्हणजेच, विश्‍वाच्या निर्मितीनंतरच्या घटनांची आतापर्यंत माहीत नसलेली माहिती या दुर्बिणीद्वारे मिळणार आहे. तब्बल वीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही दुर्बीण तयार करण्यात आली आहे. ही दुर्बीण “नासा‘ने युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनडाच्या अवकाश संस्थेच्या साह्याने तयार केली आहे.

नासाच्या जेम्स वेबची क्षमता हबल या दुर्बिणीपेक्षा शंभरपट अधिक असून, हबलपेक्षा ही तिप्पट मोठी आहे. म्हणूनच या दुर्बिणीला सुपर हबल असे टोपण नाव मिळाले आहे. निर्मिती पूर्ण झाली असली, तरी जेम्स वेबला काही चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. अवकाश उड्डाणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आवाजाच्या आणि कंपाच्या चाचणीबरोबरच अवकाशातील वातावरणामध्ये टिकण्याच्या दृष्टीने क्रायोजेनिक चाचणीही या दुर्बिणीवर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. या दुर्बिणीचा मुख्य आरसा हा अठरा षट्‌कोनी आरशांपासून बनला असून, हे आरसे बेरिलियमपासून तयार केले आहेत. किरणोत्सारी किरणांचे परावर्तन प्राप्त करण्यासाठी या आरशांवर सोन्याचा अत्यंत पातळ थर लावला आहे.

Leave a Comment