मोदी सरकारने मागितली नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याची भरपाई

ril
नवी दिल्ली: ओएनजीसी या सरकारी कंपनीच्या मालकीच्या नैसर्गिक वायूचे कृष्णा-गोदावरी खोऱ्यातून उत्पादन घेतल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजसह (आरआयएल) भागीदार कंपन्यांकडे सरकारने १.५५ अब्ज डॉलर भरपाईची मागणी केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजला पेट्रोलियम मंत्रालयाने या प्रकरणी नोटीस बजावून १.५५ अब्ज डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. नुकताच आपला अहवाल न्यायाधीश ए.पी. शाह यांच्या समितीने पेट्रोलियम मंत्रालयाला सादर केला. बंगालच्या उपसागरातील कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील ओएनजीसीच्या शेजारील क्षेत्रातून नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याबद्दल रिलायन्सने सरकारला भरपाई द्यावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीने ओएनजीसीच्या क्षेत्रातून दुसरीकडे जाणाऱ्या नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतल्याबद्दल सरकारला पैसे द्यावेत, असे समितीने नमूद केले होते.

ओएनजीसीच्या क्षेत्रातून वाहून आलेल्या वायूचे उत्पादन व विक्री रिलायन्स इंडस्ट्रीजने केली. ओएनजीसीच्या क्षेत्रातून १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१५ या काळात ११ अब्ज घटफूट नैसर्गिक वायू रिलायन्सच्या क्षेत्रात वाहून गेला. यातील 9 अब्ज घनफूट वायूचे उत्पादन रिलायन्स इंडस्ट्रीजने घेतले आहे. ही नुकसानभरपाई ओएनजीसीला न देता सरकारला द्यावी, असे समितीने नमूद केले आहे.

Leave a Comment