फोरेन्सिक लॅबोरेटरीला फोन अनलॉक तंत्रज्ञान मिळणार

cellebright
गांधीनगरच्या फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला लवकरच आयफोन व तत्सम इलेक्ट्राॅनिक उपकरणे अनलॉक करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होणार असल्याचे समजते. लॅबोरेटरीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलची सेलेब्राईट ही डिजिटल फोरेन्सिक कंपनी या तंत्रज्ञानात माहीर असून याच कंपनीबरोबर या लॅबोरेटरीची बोलणी सुरू आहेत. याच कंपनीने अमेरिकेतील बर्नाडिनो येथील हत्याकांडातील संशयित सैयद फारूक याचा आयफोन अनलॉक करण्यासाठी एफबीआयची मदत केली होती. फोन अनलॉक करण्यावरून अॅपल व एफबीआयमध्ये कायदेशीर वादही झाले होते.

आयफोन अथवा तत्सम उच्च प्रतीची उपकरणे लॉक करण्यासाठी इनस्क्रिप्शनचा वापर केला जात असतो व त्यामुळे यातील डेटा मिळविणे जवळजवळ अशक्य असते. मात्र इस्त्रायली कंपनीने असे फोन अनलॉक करून त्यातील माहिती मिळविण्याचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. जगातल्या अनेक गुप्तचर संस्था तसेच कायदा संस्था यासाठी सेलेब्राईटची मदत घेत असतात. एफबीआयकडून या कामासाठी सेलेब्राईट कंपनीने १० लाख डॉलर्स फी आकारली होती असेही समजते. भारतातील फोरेन्सिक सायन्स लॅबला हे तंत्रज्ञान मिळाले तर भारत ग्लोबल हब बनू शकेल असे सांगितले जात आहे. म्हणजे ज्या देशांत कायद्याने अशी माहिती मिळविणे शक्य नाही ते भारतातून हे काम करून घेऊ शकतील.

आयफोन सारखे फोन अनलॉक करताना पासवर्डचा शोध घेण्यात वारंवार अपयश येत असेल तर डेटा डिलिट होतो त्यामुळे माहिती मिळविणे अवघड होते. या तंत्रज्ञानाने मात्र अतिशय सुलभ रितीने फोन अनलॉक करून डेटा मिळविता येतो. फोरेन्सिक लॅबने भारतातील अन्य गुप्तचर संस्था अथवा फोरेन्सिक लॅब्जला या कामी मदत करण्याची तयारी दर्शविली असून कही फी आकारून हे काम केले जाणार आहे.

Leave a Comment