परशुरामाचा परशु असलेले टांगीनाथ धाम

tangi
भारतात सर्वत्र नमस्कार करण्याची परंपरा आहे कारण या देशात अनेक चमत्कार घडतात. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असे म्हटले जाते. देशातील लक्षावधी मंदिरे, कांही विशेष स्थाने कोणत्या ना कोणत्या चमत्काराशी संबंधित आहेत. भारत हे सनातन संस्कृतीचे केंद्र मानले जाते व वेद पुराणात उल्लेखलेले महर्षी ऋषींच्या चमत्काराचे पुरावे आजही जागोजागी पहायला मिळतात. असेच एक स्थान म्हणजे टांगीनाथ धाम.

झारखंडमधील रांचीपासून साधारण १५० किमीवर दाट जंगलात असलेले हे स्थान विष्णुचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या परशुरामाचे स्थान मानले जाते. परशुरामाने त्याच्या परशु या हत्याराने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती अशी कथा सांगतात. ज्या परशुने त्याने हा पराक्रम केला तो परशु या स्थानावर आहे असे सांगितले जाते. झारखंडमध्ये परशुला टांगी असे म्हणतात व त्यामुळे या स्थानाला टांगीनाथ धाम असे नाव पडले आहे. या ठिकाणी भेट देणार्‍या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा अनुभव सांगितला जातो.

tangi1
या ठिकाणी परशुरामाचा परशु जमिनीत घुसलेला आहे. त्याचा कांही भाग जमिनीवर दिसतो. हा परशु १७ फूट लांबीचा आहे असे सांगतात. मात्र लोखंडाचा हा परशु शेकडो वर्षे जनिमीत रूतलेला असूनही त्यावर गंज चढलेला नाही. येथेच परशुरामाची पदचिन्हेही आहेत. असे सांगतात की फार पूर्वी कांही लोहारांनी या परशुतील लोखंड काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोखंड निघाले नाहीच पण या लोहारांच्या नातेवाईकांचा अचानक गूढ मृत्यू होऊ लागला. तेव्हापासून या परशुची दहशत पसरली असून आजही या ठिकाणाच्या १५ किमी परिसरात एकही लोहार वास्तव्यास नाही.

Leave a Comment