मन्नारसेलातील अद्भूत नागराज मंदिर

mannar1
गॉडस ओन कंट्री अशी ओळख असलेल्या केरळात अनेक मंदिरांची दाटी आहे. भारतातील बहुतेक सर्व मंदिरात नाग अथवा सर्प प्रतिमा आढळतात पण केरळच्या अलेप्पीपासून ३७ किमी वर असलेले मन्नारसेलातील नागराज मंदिर हे अद्भूतच म्हटले पाहिजे. नागराज व नागयक्षी यांना समर्पित असलेल्या या मंदिरात पाहाल तेथे सर्पप्रतिमा आढळतात. या मंदिर परिसरात ३० हजारांहून अधिक सर्पप्रतिमा आहेत असे सांगितले जाते. १६ एकर जमिनीवर या मंदिराचा पसारा आहे.

या मंदिराचा संदर्भ महाभारतकालाशी जोडला जातो. महाभारतात कृष्णअर्जुनाने खांडववन अरण्य जाळल्याचे उल्लेख आहेत. हे खांडववन म्हणजेच मन्नारसेलाचा भाग असे समजले जाते. या खांडववनात नागांची अनेक घराणी जाळली गेली मात्र त्यातील कांही वाचले त्यांनी या खांडववनाचा जो कोपरा जळला गेला नव्हता तेथेच वास्तव्य केले व अर्जुनाने त्यांना अभय दिले असे मानले जाते. या मंदिराची पूजाअर्चा करण्याचा मान नम्बूगिरी ब्राह्मणांकडे असून ही पूजाअर्चा या घराण्याची सून करते असे परंपरा पाळली जाते.

mannar
असे सांगतात की या घराण्यातील एका सुनेला अपत्य नव्हते म्हणून तिने मनापासून तप केले तेव्हा वासुकी नाग प्रसन्न झाला व तिच्या पोटी पाच फण्या असलेला नाग व एक बालक जन्माला आले. त्याच नागराजाची प्रतिमा या मंदिरात आहे. संतान प्राप्तीसाठी आजही येथे अनेक जोडपी नवस बोलतात. तेव्हा जवळच्या कुंडात स्नान करून ओलेत्याने काशाचे भांडे या मंदिरात पालथे ठेवले जाते. मनोकामना पूर्ण झाली की हे भांडे सुलटे केले जाते असेही समजते. वर्षभर या मंदिरात सतत कांही ना कांही उत्सव साजरे होत असतात.

Leave a Comment