‘सर्वात फास्ट कॅशियर’ची सोशल मीडियावर बदनामी!

facebook
मुंबई : एखादी गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होते, तेव्हा तिची सत्यता पडताळलेली असतेच असे नाही. किंबहुन व्हायरल गोष्टींची एकच बाजू अर्ध्याहून अधिक वेळा प्रकाशात आलेली असते. ‘सर्वात जलद कॅशियर’ असे उपरोधिक कॅप्शन देत हिणवल्या गेलेल्या महिलेची दुसरी बाजू जाणून न घेताच तिची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शाखेत काम करणाऱ्या प्रेमलता शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बालराजू सोमीसेट्टी या फेसबुक यूझरने २४ ऑक्टोबरला त्या बँकेत संथ गतीने कॅश मोजतानाचा व्हिडिओ शूट केला आणि अपलोड केला. हा व्हिडिओ १४ लाख पेक्षा जास्त जणांनी पाहिला असून दोन लाखांपेक्षा जास्त जणांनी शेअर केला आहे.

प्रेमलता शिंदे यांची खरी कहाणी कुंदन श्रीवास्तव यांनी समोर आणल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. शिंदे फेब्रुवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत. प्रेमलतांना एकदा पॅरलिसीसचा, तर दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. संबंधित व्हिडिओ शूट करण्यात आला, त्यावेळी नुकत्याच त्या वैद्यकीय चाचण्यांनंतर कामावर रुजू झाल्या होत्या.

अनेक सुट्ट्या उर्वरित असूनही त्यांनी कामावर येणे पसंत केले. सन्मानाने निवृत्त होण्याचा त्यांचा मानस असल्याने प्रेमलता आजारपण दूर सारुन कामावर आल्या. बँक शाखेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शिंदेंना अतिरिक्त कॅश काऊण्टर देण्यात आले आहे. त्यामुळे त्या त्यांच्या गतीनुसार काम करु शकतात आणि ग्राहकांचा खोळंबा होत नाही.

Leave a Comment