नागरिकांनी ऐन दिवाळीत चायना मेडचे काढले दिवाळे

china
पुणे – चायना मेड वस्तुची मोठ्याप्रमाणावर दिवाळीत विक्री होत असते. मात्र यावेळी लोकांनी चायना मालावर बहिष्कार घातल्यामुळे ६० ते ७० टक्क्यापर्यंत विक्री होणाऱ्या वस्तूंची आता केवळ ५ ते १० टक्केच विक्री होत आहे. मागणी अभावी माल मोठ्या प्रमाणात शिल्लक रहात असल्याने, विक्रेत्यांना या वस्तूंची चांगलीच धास्ती बसली असून, ऐन दिवाळीत चायना मेड मालाचे बाजारात दिवाळे निघाले आहे.

काही दिवसांपासून सोशल मिडियावर पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या वस्तू खरेदी बंद करा. असे मॅसेज फिरत आहेत. लोकांकडून त्या मॅसेजला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परिणामी बाजारातून विविध प्रकारचे चायना मेड फटाके, साधी व इलेक्ट्रॉनिक्स खेळणी, लाईटींगच्या माळा, चॉकलेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आकाश कंदील, हवेत उडणारे कागदी फुगे, थर्मामीटर, नेलकटर तसेच जनरल स्टोअर्स आणि मेडिकलमध्ये मिळणाऱ्या कटलरी वस्तू खरेदी करण्यास लोक नकार देत असल्यामुळे ज्या विक्रेत्यांकडे या वस्तू उपलब्ध आहेत. त्यांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार आहे.

जगासाठी भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने, दिवाळीत चीनमध्ये तयार होणाऱ्या फटाक्यांपैकी सुमारे ३० टक्के फटाके भारतात येतात. खेळणीचे प्रमाण ३० ते ४०, तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रमाणही ३० टक्क्यापेक्षा अधिक आहे. तर कटलरी वस्तूंचे प्रमाणही १० ते २० टक्के आहे. मात्र या सर्वच वस्तूंची अचानक खरेदी थांबली आहे.

यामुळे बाजारातील चायना मेड वस्तू हद्दपार होत आहेत. त्यामुळे विक्रेतेही चायना मेड वस्तूंची खरेदी बंद केली आहे. ज्या विक्रेत्यांकडे जुना माल शिल्लक आहे. त्याचीही विक्री होत नसल्याचे विक्रेते सांगत आहेत. तसेच ज्या दुकानात चायना मेड वस्तू आहेत. त्या दुकानातील इतर वस्तूही खरेदी करताना लोक विचार करत असल्याने त्याचा फटकाही विक्रेत्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

चायना मेड फटाके आणि कागदी कंदील लोक नाकारत असल्याने, अनेक फटाके विक्रेत्यांकडे चायना मेड फटाके बाजूला काढून ठेवली आहेत. खेळणी खरेदीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात मंदावले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंकडेही ग्राहकांनी पाठ फिरविली असल्याने, विक्रेत्यांना ऐन दिवाळीत मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. सण आणि उत्सव काळात कटलरी वस्तूंना मागणी असते. मात्र त्या खरेदी करण्यास ग्राहक टाळाटाळ करत असल्याने, जनरल स्टोअर्स चालकांनाही त्याचा फटका बसत आहेत. तर मेडिकलमध्ये चायना मेड मोठ्या प्रमाणात चॉकलेट उपलब्ध असतात. या चॉकलेटचे पॅकींग आकर्षक असते. त्यामुळे भेट देण्यासाठी अशा चॉकलेटला दिवाळीत मागणी असते. मात्र चॉकलेट्‌सही लोक खरेदी करीत नसल्याने, चॉकलेटचे मार्केटही डाऊन असल्याचे औषध विक्रेते सांगत आहेत. यामुळे बाजारपेठेतून एकूणच चायना मेड वस्तू हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याची परिस्थिती बाजारात आहे.

Leave a Comment