नव्या रूपात म्हातारीचा बूट आणि हँगिंग गार्डन

mahtaricha-boot
मुंबई : लवकरच मुंबईच्या मलबार हिल परिसरातील सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्क या उद्यानांना नवा लूक मिळणार असून येथे अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पाच कोटी रूपये खर्च करून वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जाणार आहेत.

लवकरच कमला नेहरू उद्यानातील या सुप्रसिद्ध ‘म्हातारीच्या बुटा’ची दुरूस्ती करून त्याला आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे. गिरगाव चौपाटीकडील बाजूला ‘व्ह्युइंग गॅलरी’ केली जाणार आहे. गॅलरीचा काही प्रमाणात बाहेर येणारा आणि अधांतरी असल्याचा भास निर्माण करणारा ‘कँटीलिव्हर’ प्रकारचा कठडा बसवला जाणार आहे.

येथे दोन छोटी तळी बांधली जाणार आहेत. या तळ्यांच्या कठड्यावर आणि ‘म्हातारीच्या बुटा’वर लहान मुलांच्या गाण्यातील संकल्पना मनोहारी पद्धतीने चित्रीत केल्या जाणार आहेत. शिवाय समोरचे हँगिंग गार्डनही कमला नेहरू पार्काला पुलाने जोडले जाणार आहे. वृक्षांच्या उंचीच्या पातळीवरुन जाणारा स्कायवॉकप्रमाणे कॅनोपी वॉक तयार केला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.

दोन्ही उद्यानांमधील पायवाटा मातीच्याच ठेवण्यात येणार आहेत. फिरोजशाह मेहता उद्यानातील अनेक झाडांना प्राण्यांचा आकार देण्याचे प्रस्तावित आहे. दोन्ही उद्यानांमधील मोकळ्या जागांमध्ये चांगली हिरवळ असणार आहे. शिवाय पर्यटकांना पिण्याच्या पाण्यासाठी आकर्षक वॉटर फाऊंटन बसविले जाणार आहेत. दिव्यांगानाही उद्यान सहजरित्या पाहता यावे यासाठी जागोजागी रँम्प असणार आहेत. उद्यानातील रोपवाटिकेचे अत्याधुनिक पद्धतींचा वापर करुन नूतनीकरण केले जाणार आहे. लहान मुलांसाठी अधिक आकर्षक खेळणी बसवली जाणार आहेत. मुंबई महापालिकेचा हा प्लान यशस्वी झाल्यास या दोन्ही उद्यानांचे सौंदर्य आणखी वाढेल.

Leave a Comment