काळजीपूर्वक तपासून घ्या पाचशे, हजारच्या नोटा !

currancy
मुंबई – दिवाळीचा धामधूम देशभरात सुरू झाला असून यादरम्यान सर्वचजण मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. यावर्षी मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा बाजारात दाखल होण्याची शक्यता असल्याने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा काळजीपूर्वक तपासून घ्या अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांना करण्यात आली आहे. देशात मोठय़ा प्रमाणात व्यवहार हे रोखीच्या स्वरुपात होत असून यातूनच बाजारात बनावट नोटा दाखल होतात.

मोठय़ा प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होता कामा नये यासाठी हे निवेदन जारी करण्यात आले आहेत. मोठय़ा प्रमाणात भारतीय नोटा विदेशातून दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आपल्या निदर्शनात आले. अनोळख्या व्यक्तीकडून नोटा घेताना अथवा आर्थिक व्यवहार करताना त्यांची काळजीपूर्वक तपासणी करावी. ख-या नोटा ओळखण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून अनेकदा पत्रक जारी करत त्या कशा प्रकारे ओळखाव्यात याची माहिती देण्यात आली आहे. बनावट नोटांची काळजीपूर्वक पाहणी केल्यास त्या तत्काळ नजरेस पडतील असे बँकेने म्हटले.

या नोटांवर आणखी सुरक्षा मानके जोडण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक कोणतीही व्यक्ती व्यवहारात अशा प्रकारच्या बनावट नोटा वापर असल्याचे निदर्शनात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बँकेकडून करण्यात आले.

Leave a Comment