सूरतमधील डायमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांना छप्परफाड बोनस

surat
सूरत – गुजरातमधील सुरत येथील डायमंड व्यापारी सवजीभाई ढोलकिया यांनी त्यांच्या कंपनीतील १७१६ कर्मचाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कामासाठी बोनसच्या रुपात कार आणि घर भेट देण्याची घोषणा केली असून गेल्यावर्षी हरेकृष्णा एक्सपोर्टचे मालक सवजीभाई यांनी त्यांच्या कामगारांना ४९१ कार, २०० घरे आणि दागिने बोनस रुपात दिले होते. या वर्षी ज्यांना बोनस दिला जाणार आहे, त्या यादीत गेल्यावर्षी हा लाभ मिळालेल्या कामगारांचा समावेश होणार नाही.

यंदा कंपनीकडून १६६० कर्मचाऱ्यांना ५१ कोटी रुपये किंमतीच्या १२६० कार आणि ४०० घरे दिली जाणार आहेत. त्याशिवाय ५६ कामगारांना दागिने दिले जातील. यावर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १७१६ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कंपनीच्या स्नेह मिलन कार्यक्रमात चेअरमन सवजीभाईंनी या अनोख्या बोनसची घोषणा केली. कंपनीतील एका कामगाराने त्याला मिळणारी कार भावाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

यावेळी सवजीभाई म्हणाले, भावा-भावांमध्ये आज एकमेकांबद्दलचा द्वेष पाहायला मिळतो. त्या काळात स्वतःला मिळणारी कार भावाला भेट देण्याची इच्छा फक्त हरेकृष्णा कंपनीचे कामगारच करु शकतात. हरेकृष्ण एक्सपोर्ट कंपनीचा टर्नओव्हर वार्षिक ६ हजार कोटी रुपये आहे.

कंपनीने सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या १६६० कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. त्यातील १२०० कामगार असे आहेत ज्यांचे वेतन १० ते ६० हजारांदरम्यान आहे. ज्या ४०० कामगारांना घर देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यांना डाऊन पेमेंट द्यावा लागणार नाही. कामगारांवर डाऊन पेमेंटचा दबाव राहू नये यासाठी कंपनी पाच वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये प्रिमियम भरणार आहे. कंपनी घर खरेदीसाठी लोन मिळवून देण्यासही पूर्ण मदत करणार आहे. पुढील वर्षी हरेकृष्ण एक्सपोर्ट कंपनीला २५ वर्षे पूर्ण होणार असून कंपनीचे चेअरमन सवजीभाईंची इच्छा आहे की तोपर्यंत कंपनीतील ५५०० कामगारांकडे स्वतःचे घर आणि कार असली पाहिजे.

Leave a Comment