३२ हजार डेबिट कार्ड बँक ऑफ महाराष्ट्राने केली ब्लॉक

bank-of-maharashtra
मुंबई: नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाने हजारो ग्राहकांची एटीएम कार्ड सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॉक केली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानेही हाच निर्णय घेतला असून, बँक ऑफ महाराष्ट्राने सुमारे ३४ हजार ग्राहकांची डेबिट कार्ड ब्लॉक केली आहेत. बँकेने हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेतला अससल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या आयटी सुरक्षा विभागाने सांगितले आहे. बँकेने ऐन दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचायत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २१ हजार व्हिसा आणि १३ हजार रूपे कार्ड बँक ऑफ महाराष्ट्राने ब्लॉक केली आहेत. महत्वाचे म्हणजे कोणत्याच ग्राहकाकडून बँकेकडे फसवणुक किंवा कार्डबद्धल तशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नव्हती. तरीही बँकेने स्वत:हूनच हा निर्णय घेतल्यामुळे बँकेने घेतलेल्या या निर्णयावरून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्राचे आयटी विभागाचे महाव्यवस्थापक नरेंद्र कबरा यांनी सांगितले की, संशयास्पद किंवा फसवणुकीचे व्यवहार आमच्या कोणत्याही शाखेतून झाले नाहीत. अशा प्रकारची कोणतीही तक्रार ग्राहकांकडून नोंदवली गेली नाही. बँकेची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सक्षम असल्याचेही कबरा या वेळी म्हणाले.

पूढे बोलताना कबरा म्हणाले, आम्ही आमच्या ग्राहकांना कार्ड ब्लॉक केल्याची माहिती एसएमएसद्वारे पाठवली आहे. ज्यांना कोणाला हे कार्ड परराष्ट्रात वापरायचे असतील, त्यांनी बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन ते सुरू करून घ्यावेत, परराष्ट्रात जे या बँकेचे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही एसएमएस आणि इमेलद्वारे पोहोचलो आहोत. आम्ही त्यांचेही कार्ड ब्लॉक करण्यासाठी विनंती केली आहे, अशी माहितीही कबरा यांनी दिली आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणावरून महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वी सुमारे ६ लाख ग्राहकांची एटीएम कार्ड ब्लॉक केली होती. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानेही अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांचे कार्ड ब्लॉक झाले असेल अशा ग्राहकांनी घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. जर तुमचे कार्ड ब्लॉक झाले असेल, तर तुमच्या जवळच्या बँक शाखेला भेट द्या. तिथे गेल्यावर संबंधीत अधिकाऱ्याला तुमची समस्या सांगा. त्याने सांगितलेल्या माहितीची आणि सुचनांची पूर्तता करा. तुमचे कार्ड आपोआप सुरू होईल किंवा तुम्हाला बँकेकडून नवे कार्डही मिळू शकेल.

Leave a Comment