यादव कुटुंबात फूट

akhilesh
उत्तर प्रदेशात येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होईल असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सूचित केले आहे. ही निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे राज्यातले वातावरण वेगाने बदलत चालले आहे. भारतीय जनता पार्टीला तिथे सत्ता मिळेल की नाही याविषयी काही लोकांच्या मनात शंका होत्या परंतु गेला आठवडा तरी या शंकांचे निरसन होऊन भाजपाला अनुकूल वातावरण असल्याचे समजले जायला लागले आहे. भाजपाचे नशिब एवढे चांगले की त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी स्वतःला काहीच करावे लागत नाही. कॉंग्रेसमधील धुसफुशीतून रिटा बहुगुणा जोशी या भाजपमध्ये आल्या आणि तिथल्या भांडणाचा फायदा भाजपाला मिळाला. कॉंग्रेसचा ब्राह्मण चेहरा समोर ठेवण्याचा डाव असा उधळला गेला आणि आता समाजवादी पार्टीतल्या अंतर्गत कलहाचे फायदे आपोआप भाजपाला मिळावेत इतका हा कलह विकोपाला गेला आहे. कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव स्वतःचा पक्ष स्थापन करतील इतपत हा संघर्ष टोकाला गेलेला आहे.

आजवर हा संघर्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव या दोघातलाच असल्याचे वाटत होते. यथावकाश मुलायमसिंग यादव दोघांचीही समजूत काढतील आणि संघर्ष संपून सामसूम होईल असे वाटत होते. परंतु आता हा संघर्ष अखिलेश विरुध्द मुलायमसिंग असा पितापुत्रातलाच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तो गंभीर स्वरूप धारण करायला लागला आहे. मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी आपल्या वडिलांनाच आव्हान द्यायला सुरूवात केली आहे. काका शिवपाल सिंग आणि पुतण्या अखिलेशसिंग हे दोघेही एकमेकांच्या विरोधात कितीही कारवाया करत असले तरी शेवटी आपण नेताजींचा शब्द प्रमाण मानू अशी ग्वाही देत होते. नेताजी न्यायनिवाडा करतील आणि पक्षफूट टळेल असे राजकीय वर्तुळात मानले जात होते. परंतु या संघर्षात मुलायमसिंग यादव म्हणजेच नेताजी मुलापेक्षा भावाकडे जास्त कललेले आहेत. त्यामुळे काल ही फूट मुलायमसिंग आणि शिवपाल विरुध्द अखिलेश आणि रामगोपाल अशी असल्याचे स्पष्ट झाले. मुलायमसिंग यांचा आदेश झुगारून अखिलेश यादव यांनी आमदारांची बैठक बोलावली. युवक आपल्या मागे आहेत असा आपल्या पिताजींना इशारा दिला. त्यामुळे संतापलेल्या मुलायमसिंग यादवांनी अखिलेश यादव यांचे समर्थक असलेले आपले बंधू रामगोपाल यादव यांना पक्षातून काढून टाकले.

आपण कोणत्याही क्षणी अखिलेश यादव याला पक्षातून काढू शकतो असा संकेत त्यांनी दिला. युवक अखिलेश याच्या मागे नसून आपल्याच मागे आहेत असेही नेताजींनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात दोन समाजवादी पार्ट्या उतरलेल्या दिसतील. मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबामध्ये सत्तेचे जादाच केंद्रीकरण झाले आहे. मुलायमसिंग यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातले पाचजण खासदार आहेत. दोघे मंत्री आहेत. शिवाय सहकारी बँक आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यादव या एकाच कुटुंबातले जवळपास २२ जण सत्तेची कसलीना कसली पदे उपभोगत आहेत. सत्तेचे अजीर्ण झाल्यागत या मंडळींनी नेताजींच्या वजनाचा फायदा घेऊन आणि आपल्या जातीय राजकारणाचा लाभ उठवत सत्ता केवळ केंद्रितच केली आहे असे नाही तर सत्तेचा गैरवापर करून भरपूर माया कमवली आहे. त्यामुळे कोणाच्या भाकरीवर जास्त लोणी ओढले जाते यावरून या कुटुंबात कलह सुरू झाला त्याचाच हा सारा परिणाम आहे. मुळातच मुलायमसिंग यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर आणि सुनेवर सीबीआयच्या खटल्यांची टांगती तलवार आहे.

एकेवर्षी त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलात दुसर्‍या वर्षामध्ये एकदम २० कोटींची वाढ झाली. म्हणजेच त्यांनी तसे अधिकृतरित्या दाखवले. प्रत्यक्षात मालमत्तेत किती कोटींची वाढ झाली हे त्यांनाच माहीत. परंतु अनेक प्रकारच्या मालमत्ता लपवून ठेवूनसुध्दा प्रामाणिकपणाचा आव आणून जी मालमत्ता त्यांनी जाहीर केली ती जाहीर करतानासुध्दा बुध्दीचा वापर केला नाही. एकदम २० कोटींची वाढ दाखवली. मात्र ही २० कोटींची मालमत्ता नेमकी कशी कमावली याचे कसलेही तपशील मुलायमसिंग यादव यांना दाखवता आले नाहीत आणि तेव्हापासून अवैध संपत्ती अर्जित करण्याच्या संबंधात त्यांच्यावर सीबीआय खटल्याचे सावट आहे. मुलायम सिंग यादव यांचे उत्तर प्रदेशात चांगलेच वजन आहे आणि देशातल्या भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना उत्तर प्रदेश फार महत्त्वाचा वाटतो. केंद्रातली आपली सत्ता सांभाळण्यासाठी मुलायमसिंग यादव यांचे राजकीय वजन या दोघांनाही वापरायचे असते आणि ते त्यांच्या मनाजोगते वापरता यावे यासाठी आधी कॉंग्रेसने आणि आता भाजपाने मुलायमसिंग यादव यांच्या डोक्यावर कारवाईची तलवार कायम टांगती ठेवली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवरच मुलायमसिंग यादव यांना राजकारण करावे लागते. त्यातच त्यांचे बंधू रामगोपाल आणि त्यांचा मुलगा यांच्यावर नव्याने खटले दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनाही सातत्याने भाजपाला अनुकूल भूमिका घेणे भाग पडते आणि त्याचाच एक भाग म्हणून हे सारे राजकारण होत आहे. नेताजींच्या कुटुंबात सत्तेची साठमारी सुरू असल्याचे दृश्य वरकरणी दिसत असले तरी मुळात आतून हा सारा संघर्ष सत्तेचा फायदा घेऊन संपत्ती कोणी आणि किती कमवायची यातून निर्माण झालेला आहे. कोणत्याही क्षणी मुलायमसिंग आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव हे दोघेही वेगळ्या पक्षात असल्याचे आपल्याला बघायला मिळेल. कारण आता या कौटुंबिक कलहात एवढी कटुता वाढली आहे की पक्षाच्या चिरफाळ्या उडण्याशिवाय अन्य काही पर्याय राहिला नाही.

Leave a Comment