जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना ३०५० कोटींचा दंड

jio
नवी दिल्ली – एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल ३०५० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केली आहे. रिलायन्स जियोला या कंपन्यांनी ‘इंटरकनेक्शन‘ सुविधा देण्यास नकार देत दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याचे ट्रायने म्हटले आहे.

रिलायन्स जियोला इंटरकनेक्शन पॉईंट्स या कंपन्यांनी उपलब्ध न करुन दिल्याने जियोच्या क्रमांकावरुन ही तीन नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना कॉल करण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप रिलायन्स जियोतर्फे करण्यात आला होता.

यावर ट्रायने म्हटले आहे की, एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया त्यांच्या दूरसंचार परवान्यातील नियमांचा भंग केला ही बाब दृश्य आहे. हे कृत्य सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे. नियमांप्रमाणे अशा कंपन्यांचा परवाना रद्द होऊ शकते. परंतु यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार असल्याने कंपन्यांना दंड ठोठावण्यात येईल. एअरटेल आणि व्होडाफोन सुमारे 21 परिमंडळांसाठी (जम्मू काश्मीर वगळता) १०५० कोटी रुपयांचा दंडासाठी पात्र आहेत, तर आयडियाला १९ परिमंडळांमध्ये (हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, आणि ईशान्य भारतातील राज्ये वगळता) ९५० कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

Leave a Comment