दिल्लीतील कोंबड्यांना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक

delhi
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियानंतर बर्ड फ्लू या रोगाने जोरदार थैमान घातले असून राजधानी दिल्लीत बर्ड फ्लूचा संभाव्य धोका पहाता आरोग्य खात्यातर्फे ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्ली शहरात डेंग्यूचा झपाटय़ाने झालेला प्रसार पाहता आता राज्य सरकारने बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेतला आहे. राज्यात १० पक्ष्यांच्या मृत्यूमुळे साशंकता निर्माण झाली असून, राज्य सरकारसह प्रशासन अलर्ट झाले आहे. यासाठीच दिल्लीचे विकास मंत्री गोपाल राय यांनी शहरातील गाजीपूर चिकन मार्केटचा दौरा केला. राय यांच्या या दौ-यादरम्यान त्यांच्यासोबत तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक उपस्थित होते.

मंत्री गोपाल राय यांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी चिकन मार्केटमध्ये पक्ष्यांची तपासणी केली. मार्केटमध्ये घेण्यात येत असलेल्या खबरदारीबाबतही पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर राय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चिकन मार्केटमध्ये आणण्यात येणा-या पक्ष्यांची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे. शहरातील परिस्थिती पूर्णतः नियंत्रणाखाली असून, मार्केटमध्ये आणण्यात येणा-या २.२ लाख पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचा खुलासा गोपाल राय यांनी केला आहे.

चिकन मार्केटमध्ये आणण्यात येणा-या पक्ष्यांची बारकाईने तपासणी केली जाणार असून, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे राय म्हणाले. बर्ड फ्लूचा शहरात होणारा फैलाव रोखण्याकरीता सरकारकडून मेडिकल कार्ड जारी करण्यात येणार असून, याचा वापर गाजीपूर चिकन मार्केटच्या प्रवेशद्वारावर केला जाणार आहे. २३ ऑक्टोबरपासून फिटनेस प्रमाणपत्राविना पक्ष्यांची वाहतूक करणा-या कोणत्याही वाहनाला बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही. पशुपालन विभाग आणि अधिका-यांचे एक पथक याकरिता नियुक्त केले जाणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही