फक्त ३ डिसेंबरपर्यंतच ‘जिओ’चे लॉलीपॉप

reliance-jio
मुंबई – स्मार्टफोन प्रेमींवर रिलायन्स जिओचा गेल्या अनेक दिवसांपासून बोलबाला आहे. पण आता ट्रायच्या नव्या नियमामुळे जिओला चाप लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिलायन्सला ३१ डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देणारा आपला निर्णय बदलावा लागण्याची शक्यता आहे. ट्रायने रिलायन्स जिओच्या मोफत व्हॉइस कॉलिंग आणि फ्री इंटरनेटचा ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर केलेल्या प्लानवर यावर आक्षेप घेतल्याने रिलायन्सची फ्री ऑफर बोंबली आहे. ३ डिसेंबरपर्यंत फ्री इंटरनेट आणि व्हॉइसकॉलची ही सुविधा मिळणार आहे. ४ डिसेंबरला सबक्राइब करणाऱ्यांना ही ऑफर मिळणार नाही.

केवळ ३ डिसेंबरपर्यंत रिलायन्स जिओला मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायने दिला आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्स ट्रायच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याची तक्रार ट्रायकडे केली होती. त्यानंतर ट्रायने नियमानुसार रिलायन्स जिओला केवळ ९० दिवसच मोफत कॉलिंग देण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे रिलायन्स जिओच्या मते, नियमानुसार ३१ डिसेंबरपर्यंतच ही सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे रिलायन्स आता ट्रायचा आदेश मानणार की, ३१ डिसेंबरपर्यंत मोफत सेवा सुरु ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या संदर्भात एका वृत्त संस्थेने रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ३ सप्टेंबरपासून रिलायन्स जिओ घेतलेल्यांना ३१ डिसेंबरपर्यंत फ्री इंटरनेट आणि फ्री व्हॉइसकॉलची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा ३ डिसेंबरपर्यंत रिलायन्सचे कार्ड घेणाऱ्यांना मिळणार आहे.

Leave a Comment