युरोपच्या मंगळयानाचे सिग्नल जीएमआरटीने पकडले

gmrt
पुणे- खोदडच्या जायन्ट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोपने (जीएमआरटी) युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने मंगळाच्या मोहिमेवर पाठविलेल्या यानाचे सिग्नल पकडले असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

काल रात्री १ च्या सुमारास युरोपियन स्पेस एजन्सीने एक्सोमार्स मिशन अंतर्गत पाठविण्यात आलेले द ट्रेस गॅस ऑरबिटर (टीजीओ) हे अवकाश यान मंगळाच्या कक्षेत पोहचले. त्याचे सिग्नल्स जीएमआरटीने पकडल्याने ईएसएच्या संशोधकांनी भारतीय संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

संस्थेचे प्रमुख यशवंत गुप्ता यांनी ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे मनोगत म्हटले आहे. युरोपच्या अवकाश संशोधन संस्थेने मंगळयानाची हालचाल पाहण्यासाठी आणि मंगळाचे गुणधर्म पाहता यावे या दृष्टीने एक्सोमार्स या प्रकल्पासाठी पुण्याच्या नॅशनल सेंटर फॉर रेडियो अॅस्ट्रोफिजीक्सची निवड केली होती. युरोपियन मंगळयानाने प्रसारित केलेले सिग्नल (४०१ मेगा हर्ट्ज) जीएमआरटीने पकडले आहे. या मोहिमेला सहा महिने पूर्ण झाले आहेत.

एक्सोमार्सच्या अभ्यासासाठी युरोपियन संशोधन संस्थेनी जगातील विविध ठिकाणांची पाहणी केली होती. मंगळयानावर लक्ष ठेवण्यासाठी निवड झालेली जीएमआरटी ही एकमेव भारतीय संस्था असल्याचे नॅशनल सेंटर फॉर रेडियो अॅस्ट्रोफिजीक्सचे प्रशासकीय अधिकारी अभिजीत जोंधळे यांनी ईनाडूला सांगितले.

१४ मार्च २०१६ रोजी एक्सोमार्स प्रक्षेपित करण्यात आले होते. तेव्हापासून जगातील विविध संस्था यानाच्या मागावर होत्या. नारायणगाव जवळील खोदड येथे महाकाय दुर्बिणीने त्याचे सिग्नल्स पकडले आणि त्याचा मार्गक्रम शोधला अशी माहिती जोंधळे यांनी दिली. जगातील इतर रेडियो स्टेशनच्या तुलनेत आपण पकडलेले सिग्नल्स संवेदनशील होते असे ते म्हणाले.

Leave a Comment