तेलंगणात विवाहित हनुमानाचे मंदिर

suvarchana
रामभकत महाबली हनुमान हा बाल ब्रह्मचारी म्हणूनच देशभर भजला पुजला जातो. मात्र तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात विवाहित हनुमानाचे त्याची पत्नी सुवर्चना सह एक मंदिर असून हे मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे सांगितले जाते. सुवर्चना ही सूर्याची मुलगी होती आणि पाराशर संहितेत हनुमानाच्या विवाहाची कथा सांगितली गेली आहे. या मंदिरात हनुमान व सुवर्चना या दोघांच्याही प्रतिमा आहेत. असाही समज आहे की जो कुणी या मंदिरात येऊन हनुमान सुवर्चनेचे दर्शन घेतो, त्याच्या वैवाहिक आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात व पती पत्नीतील प्रेमही वाढते. हैद्राबादपासून साधारण २२० किमीवर हे स्थळ आहे.

हनुमानाचा गुरू होता सूर्यदेव. सूर्यदेवाला दिव्य ९ विद्या प्राप्त होत्या. सूर्यदेवाचे हे सर्व ज्ञान बजरंगबलीला प्राप्त करून घ्यायचे होते. त्याप्रमाणे सूर्यदेवाने या ९ विद्यातील ५ विद्या हनुमानाला दिल्या पण बाकीच्या चार विद्या तो देऊ शकत नव्हता कारण या चार विद्या घेण्यासाठी विवाहित असणे बंधनकारक होते. हनुमानाला सर्व नऊ विद्या हव्याच होत्या तेव्हा सूर्यदेवाने त्याला तू विवाह कर असा सल्ला दिला. हनुमानाने तो नाकारला. मात्र विद्या त्याशिवाय प्राप्त होणार नाहीत म्हटल्यावर हनुमान विवाहाला तयार झाला. त्यानंतर त्याच्यासाठी वधूचा शोध सुरू झाला.

सूर्यदेवाने हनुमानाला तुला विद्याही मिळतील व तुझे ब्रह्मचर्य कायम राहील असे सांगितले व त्याची मुलगी सुवर्चना हिच्याशी विवाह करण्याचा सल्ला दिला. सुवर्चना ही अतिशय तेजस्वी व परमतपस्वी होती. सूर्यदेव म्हणाला सुवर्चनेचे तेज फक्त तूच सहन करू शकशील. तसेच लग्न होताच ती पुन्हा तपस्येत मग्न होईल त्यामुळे तू ब्रह्मचारी राहशील पण विवाहित असल्याने उरलेल्या चार विद्याही तुला आत्मसात करता येतील. अशा तर्हेअने बाल ब्रह्मचारी हनुमान विवाहित झाला पण त्याचे ब्रह्मचर्यही कायम राहिले.

Leave a Comment