दर ८१ हजार वर्षांनंतर बदलते चंद्राचे रूप

moon
अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी व कार्नेल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नासाच्या आकडेवारीच्या सहाय्याने केलेल्या संशोधनात दर ८१ हजार वर्षांनी चंद्राचे रूप बदलत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा बदल प्रामुख्याने धुमकेतूंची टक्कर अथवा लघुग्रह, उल्का चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्याने होत असलेल्या खड्यांमुळे होतो असेही दिसून आले आहे. यामुळे चंद्राचा पृष्ठभाग बदलत राहतो. संशेाधकांनी या वेगाचा जो अंदाज केला होता त्यापेक्षा प्रत्यक्षात नऊपटीने हा वेग अधिक असल्याचेही दिसून आले आहे.

नासा अंतराळ यानाने पाठविलेले फोटो व त्यानुसारच्या आकडेवारीचा अभ्यास करताना असे दिसले की धुमकेतू, उल्का व लघुग्रह यांच्यामुळे चंद्रावर सतत कांही तरी नवीन तयार होते व जुने नष्ट होत असते. चंद्रावर यामुळे जे खड्डे बनतात त्यांचे वय चंद्रावर दिसलेल्या अन्य गोष्टी व सौरमंडळाचा अभ्यास केला असता समजू शकते. नासा लूनार रिकानसन्स ऑर्बिटर कॅमेर्‍याने पाठविलेली पूर्वीची चित्रे व त्याच भागातील आत्ताची चित्रे यावरून चंद्रावर नवे २२२ खड्डे पडल्याचे दिसून आले असून गतवेळच्या विवरांपेक्षा ही संख्या ३३ टक्के अधिक आहे असे नेचर या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले गेले आहे.

Leave a Comment