या देवीला वाहिल्या जातात हातकड्या, बेड्या

jalore
कोणत्याही देवीच्या मंदिरात भाविक देवीला साडीचोळी, नारळाची ओटी अशा प्रकारच्या वस्तू अर्पण करताना आपण पाहतो. अनेक मंदिरात सिंदूर, मेंदी, बांगड्याही अर्पण केल्या जातात. मात्र देवीच्या मंदिरात कधी हातकड्या, बेड्या अर्पण केल्याचे आपण ऐकले आहे का? राजस्थानातील प्रतापगढ जिल्ह्यातील जालोर येथे असलेल्या दिवाक माता मंदिरात देवीला हातकड्या व बेड्या अर्पण केल्या जातात. हे मंदिर प्राचीन आहे व आजही येथे २०० वर्षे जुन्या वाहिलेल्या बेड्या पाहायला मिळतात.

या प्रथेसंदर्भात एक कथा सांगितली जाते. पृथ्वीराजा नावाचा प्रसिद्ध डाकू या देवीचा निस्सीम भक्त होता. तो तुरूंगात असताना त्याने देवीला नवस केला की तो जर तुरूंग फोडून पळून जाण्यात यशस्वी झाला तर प्रथम तिच्या दर्शनाला येईल. आश्वर्य म्हणजे देवीच्या नुसत्या स्मरणाने त्याच्या हातातील बेड्या तुटल्या. तो तुरूंग फोडून पळण्यात यशस्वीही झाला व त्याने त्या बेड्या या देवीच्या चरणाशी वाहिल्या. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. अनेक डाकू येथे डाका सफल झाला व पोलिसांच्या कचाट्यातून वाचले तर हातकड्या वाहायचा नवस देवीला करू लागले. असेही सांगितले जाते की देवीचे नुसते नाव घेतले तरी बेड्या आपोआप खुल्या होतात.

आजही या मंदिरात ज्यांचे नातेवाईक अथवा मित्र तुरूंगात असतील अथवा अटकेत असतील तर ते लोक येऊन देवीला हातकड्या वाहतात. आपल्या नातेवाईकांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी हा नवस केला जातो.

Leave a Comment