बाबांच्या दर्शनाचा व्हिआयपी पास घेण्यासाठी कुणाच्याही शिफारशीची नाही गरज

saibaba
शिर्डी: साईबाबांच्या दर्शनासाठी व्हिआयपी पासवरून होणाऱ्या वादावर शिर्डी संस्थानाने त्यावर जालीम उपया काढला आहे. आता यापुढे व्हिआयपी पास घेण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही शिफारशीची गरज नाही. जे पैसे भरतील त्या सर्वांना मंदिरातून व्हिआयपी पास मिळणार आहे. एवढेच नाहीतर दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मोफत चहा, कॉफी, दूध आणि बिस्कीटे दिले जाणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.

जास्तीत जास्त सुविधा भाविकांना देण्याचा आमचा मानस असून यापुढे भाविकाने दर्शनासाठी रांगेत उभे राहताच त्याच्या कपाळावर गंध लावून त्याचे स्वागत करण्यात येईल. याआधी व्हिआयपी पास मिळवण्यासाठी शिफारस लागत असे आता ती लागणार नाही. आधीच्या नियमामुळे ठराविक वर्गालाच व्हिआयपी पास मिळायचे, पण आता हा पास जे पैसे भरतील त्या सर्वांनाच मिळणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली.

त्याचबरोबर साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या सर्व ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना रांगेत प्रतिक्षा करावी लागणार नाही. अपंगांना गेट क्रमांक तीनमधून निशुल्क दर्शन दिले जाणार आहे. यासोबत रांगेत कुलर्सही बसवण्यात येणार आहेत. यासोबत थेट स्क्रिनच्या माध्यमातूनही अनेकांना साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसर, भक्त निवास, गर्दीची ठिकाणे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन या सर्व ठिकाणी एलईडी लावून भाविकांना साईबाबांचे दर्शन घडवण्यात येणार आहे. यासोबतच संस्थानचे विविध व्यवस्थेचे दर, सोयी-सुविधा यांचीही माहिती त्यावरून देण्यात येणार आहे.

Leave a Comment