सिक्कीममधली आगळीवेगळी दिवाळी

kutra
इशान्येकडील राज्यात तसेच सिक्कीम व शेजारी नेपाळ राज्यात आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. येथे दिवाळी पाच दिवसांची असतेच पण ती भारतातील दिवाळी पूर्वीच साजरी होते. या दिवाळीचे वैशिष्ठ म्हणजे येथे प्राणीपूजा केली जाते व त्यातही महत्त्वाची असते ती कुत्र्याची पूजा. प्रत्येक वर्षी आक्टोबरमध्ये ही दिवाळी साजरी होते पण त्याला तिहार पर्व म्हटले जाते.

नेपाळींसह या इर्शान्य राज्यातील लोक कुत्रा हा भगवान भैरवाचे रूप म्हणून पुजतात. पाच दिवसांच्या या सणात पहिल्या दिवशी कावळ्याची पूजा केली जाते. कावळ्याला येथे यमाचा दूत म्हणून पुजले जाते. दुसरा दिवस असतो कुत्रा पूजनाचा. या दिवशी कुत्र्याला लाल तिलक लावून त्याला झेंडूच्या माळा घातल्या जातात व त्याला मिष्ठान्ने खायला घातली जातात. विशेष म्हणजे नेपाळमध्ये पोलिस दलातील प्रशिक्षित कुत्र्यांचेही याच प्रकारे पूजन करून त्यांची रेस लावली जाते. कुत्र्यासारखा इमानदार प्राणी अन्य कोणताही नाही म्हणून हा मान त्याला दिला जातो.

तिसरा दिवस असतो गोपूजनाचा. या दिवशी गाईची पूजा केली जाते. गाईला येथे लक्ष्मीचे रूप मानले जाते. चौथा दिवस असतो बैल पूजनाचा. बैलाला येथे शक्तीची देवता मानून त्याचे पूजन केले जाते तर पाचवा दिवस बहिणी आपल्या भाऊरायांना ओवाळून साजरा करतात. या दिवशीही भाऊ बहिणीकडे जातो व तेथे त्याला झेंडूची माळ घालून ओवाळले जाते व गोडधोडाचे जेवण केले जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन महिला तेथील पारंपारिक गाणी गातात व त्याबद्दल ओवाळणी घेतात. सिक्कीमसारख्या ठिकाणी दिवाळीचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देतात.

Leave a Comment