भारतातही येणार कारखाना शेती तंत्रज्ञान

sheti
शेती करण्याची युवा पिढीला कितीही इच्छा असली तरी त्यासाठी शेतजमीन असणे आवश्यक आहे. मात्र आता शेतजमीनीशिवाय शेती करण्याचे नवे तंत्र जपानमधील कंपनीने लोकप्रिय केले असून याच धर्तीवर लवकरच भारतातही शेती सुरू होईल असे समजते. जपानी कंपनी मिराईने वैज्ञानिकांच्या सहकार्याने ही बिनामातीची शेती जपानमधील मोठमोठ्या बंद पडलेल्या कारखान्यातून सुरू केली असून सध्या ४० कारखान्यात अशी शेती केली जात आहे.

जपानमध्ये वादळ, भूकंप असा नैसर्गिक संकटांचा धोका नेहमीच असतो व त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो.त्यावर उपाय म्हणून २००२ पासून कशिस्वा सिटीतील रहिवासी असलेल्या तुत्सुओ मुरोता यांनी बंद पडलेल्या कारखान्यांचा वापर करून शेती करण्याच्या प्रयत्नांना सुरवात केली. २००४ मध्ये वैज्ञानिकांच्या सहकार्याने त्यांनी विनामाती, विना खते व विना किडनाशके शेती करता येणारे तंज्ञ विकसित केले. त्याला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान असे म्हणतात. या शेतीसाठी फक्त पाणी लागते व प्रकाशाची गरज छोटे छोटे एलईडी दिवे बसवून पुरविली जाते. या शेतीतून मिळणारे उत्पादन पारंपारिक शेतीपेक्षा दीड ते अडीचपट अधिक आहे असा दावा केला जात आहे. या प्रकारे अनेक प्रकारच्या भाज्या व धान्ये पिकविता येतात. मिराई कंपनीला यासाठी अनेक अॅवॉर्ड मिळाली आहेत.

कंपनीने सोनी इलेकट्राॅनिक्स ही नुकतीच बंद पडलेली १५ मजली इलेक्टॉनिक कंपनीही अशा शेतीसाठी घेतली असून हे जपानमधील सर्वात मोठे शेत असेल असे समजते. कंपनी मंगोलिया, हाँगकाँग, रशिया, चीन येथे या शेतीचे मार्गदर्शन करत असून लवकरच भारतातही हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनीला वरील देशांतील ५८० बंद कारखान्यांकडून अशी शेती करण्यासाठीच्या ऑफर्स आल्या असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment