दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी

car
पुणे – मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या दसऱ्यानिमित्त करण्यात आली. वाहनखरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्रमी नोंदणी झाली. याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन विभागाद्वारे दिलेल्या माहितीनुसार साडेचार हजार दुचाकी वाहनांची, तर सुमारे १ हजार ७६० चारचाकी वाहनांची दसऱ्यानिमित्त नोंदणी झाली असल्याचे सांगितले.

वाहनखरेदीला बाजारपेठांत उधाण आले असून सुमारे ७ हजार वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यावर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पसंतीचे वाहन मिळावे म्हणून अनेकांनी महिन्यापूर्वीच नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. आपल्या आवडीचे वाहन दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी नेण्याचा अनेकांनी संकल्प केला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यापासूनच वाहन खरेदी नोंदणीला वेग आला होता.

परिवहन विभागाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ४ हजार ५४० दुचाकी वाहनांची नोंदणी दसऱ्यानिमित्त करण्यात आली आहे. तसेच यावर्षी ग्राहकांनी चारचाकी वाहनांनाही मोठ्या प्रमाणावर पसंती दिली. सुमारे सतराशे साठ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर इतर वाहनांमध्ये ८० रिक्षांची, २४५ टुरिस्ट टॅक्सी, १८ प्रवासी बसेस, २७३ मालवाहू वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वच वाहन प्रकारांमध्ये यावर्षी विक्रमी वाहन खरेदी करण्यात आली. गेल्यावर्षी दसऱ्यानिमित्त २ हजार ५३३ दुचाकींची ग्राहकांनी खरेदी केली होती. यावर्षी यामध्ये दुपटीने वाढ झाली. एकूण ४ हजार ५४० दुचाकींची खरेदी करण्यात आली. त्याचबरोबर गेल्यावर्षी १ हजार ९४ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली. यावर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन सुमारे १ हजार ७६० चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली.

गेल्यावर्षी फक्त ७ रिक्षांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये वाढ होऊन ८० रिक्षांची खरेदी करण्यात आली. गेल्यावर्षी फक्त ५४ टुरिस्ट टॅक्सींची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र, २४५ टॅक्सींची खरेदी करण्यात आली. मालवाहू वाहनांच्या खरेदीमध्ये यावर्षी मोठी वाढ दर्शविण्यात आली. गेल्यावर्षी ७२ मालवाहू वाहने खरेदी करण्यात आली होती. यावर्षी यामध्ये वाढ होऊन २७३ मालवाहू वाहनांची खरेदी करण्यात आली.

दसऱ्यानिमित्त वाहन उत्पादक कंपन्यांनी देऊ केलेल्या खास सवलती, कमीत कमी डाऊन पेमेंट, नोंदणी आणि विम्यातील सवलत यामुळे ग्राहकांचा कल यावर्षी वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून आला. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.

Leave a Comment