जपानमध्ये आली डिजिटल बेबी

saya
जपानमध्ये गतवर्षीच सेलिब्रिटी स्टार बनलेली साया आता नव्या स्वरूपात सादर केली गेली असून साया ही संगणक लॅबमध्ये तयार झालेली डिजिटल बेबी आहे यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण झाले आहे. एखाद्या सर्वसामान्य शाळकरी मुलीप्रमाणे दिसणारी साया जपानी लोकांच्या हृदयात विराजमान झाली आहे. ही जिवंत मुलगी नाही यावर विश्वास ठेवणेही अवघड जाते आहे असे नागरिक सांगतात.

युका इशिकावा या महिला ग्राफिक डिझायनरने तिच्या पतीच्या सहाय्याने साया तयार केली आहे. तिचे फोटो ऑनलाईनवर टाकले गेले तेव्हा साया म्हणजे संगणक डिझाईनची कमाल आहे यावर कोणी विश्वासही ठेवला नाही इतकी ती हुबेहुब जिवंत मुलीसारखी दिसते. अर्थात तिच्या चेहर्‍यावर माणसांसारखे हावभाव येण्यासाठी तसेच तिच्यात जिवंतपणा वाटण्यासाठी गेले वर्षभर या दोघांनीही चिकाटीने काम केले आहे. नव्या व्हर्जनमधील सायाच्या चेहर्‍यावर इतके सहजभाव आहेत की त्यामुळे जगाला चकीत होण्याची पाळी आली आहे. ती १७ वर्षांची दिसते मात्र प्रत्यक्षात तिला वयच नाही.

इशिकावा सांगते सारामध्ये जपानी महिलांतील सर्व चांगले गुण येतील अशी काळजी घेतली गेली आहे. ती दयाळू आहे, चांगली मुलगी आहे आणि क्यूटही आहे. या आठवड्यात जपानमध्ये भरत असलेल्या काँम्प्युटर इलेक्ट्राॅनिक प्रदर्शनात सायाला सादर केले जाईल. लवकरच साया सर्वसामान्य माणसाप्रमाणे चालू व बोलूही शकेल असेही समजते.

Leave a Comment