अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅपल-सॅमसंग लढाई

apple
वॉशिंग्टन : अ‍ॅपलने आता अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात सॅमसंग विरोधातील डिझाईन पेटंटचा भंग केल्याबद्दलचा दावा नेला आहे. सॅमसंगने आपल्या आयफोनचे डिझाईन चोरल्याचा आरोप अ‍ॅपलने केला आहे. अ‍ॅपलला डिझाईन चोरीमुळे किती आर्थिक नुकसान झाले, याची सुनावणी न्यायालय घेणार आहे.

अमेरिकेत गेल्या १०० वर्षांत पेटंट कायद्यांतर्गत डिझाईन चोरीचा कोणत्याही प्रकारचा खटला दाखल झालेला नाही. त्यामुळे या खटल्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. हा दावा अनेक महिने चालेल असे मानले जात आहे. फेडरल सर्किटच्या अपील न्यायालयाने अ‍ॅपलचा ४०० दशलक्ष डॉलरचा दावा याआधी मान्य केला आहे. सॅमसंगने अ‍ॅपलच्या आयफोनचे फ्रन्ट स्क्रीन आणि ग्राफिकल टचस्क्रीन डिझाईन चोरल्याचे न्यायालयाने मान्य केले होते.

अ‍ॅपलच्या दाव्याला सॅमसंगने आव्हान दिले आहे. विशिष्ट डिझाईनची कॉपी केल्यामुळे नेमके किती नुकसान झाले, हे कसे ठरविणार यावर सॅमसंगने वाद उभा केला आहे. सध्या अशा वस्तूपोटी मिळणाऱ्या एकूण नफ्यावरून नुकसान काढले जाते. हा नियम १८८७ साली बनविण्यात आला होता. त्यात १९५२मध्ये सुधारणा करण्यात आली होती. विकलेल्या स्मार्टफोनवरील संपूर्ण नफ्यावरून नव्हे, तर नफ्याच्या काही हिश्शावरून नुकसानीचा आकडा काढावा, असे सॅमसंगचे म्हणणे आहे.

Leave a Comment