दसर्‍याला येथे होते रावणपूजन

ravan2
विजयादशमी म्हणजे दसरा म्हटले की रावणदहन चटकन डोळ्यापुढे येते. मात्र भारतात कांही ठिकाणी दसर्‍याला रावणदहन होत नाही तर वेथे रावणाचे पूजन केले जाते. या ठिकाणांवर रावणाची मंदिरे आहेत. सीताहरणामुळे रावणाबद्दल आपल्या मनात अढी असली तरी रावण हा दशग्रंथी व विद्वान होता तसेच तो शंकराचा निस्सिम भक्तही होता. रावणाची मंदिरे असलेली कांही स्थाने खालीलप्रमाणे आहेत.

मध्यप्रदेशातील विदिशा येथे राक्षसराज रावण मंदिर असून येथे रावणाची पूजा अर्चा केली जाते. मध्यप्रदेशातील रावणाचे हे पहिले मंदिर मानले जाते. कारण मध्यप्रदेशाच्या मदसौरी म्हणजेच दशपूर येथेही रावणरूंडी स्थानावर रावणाची विशाल मूर्ती आहे. रावणाची पत्नी मंदोदरी ही या गावची होती व तिच्यावरूनच या गावाला मदसौरी नांव पडल्याचेही सागितले जाते. रावण या गावचा जावई असल्याने त्याचा येथे मोठा मान राखला जातो.

ravan
कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात ही नवीन धान्याची पूजा करताना रावणपूजा केली जाते. येथे रावणाची मिरवणूकही काढली जाते. रावणाला येथे हा मान तो शिवाचा परमभक्त असल्यामुळे दिला जातो. लंकेश्वर म्हणून त्याची महादेवासोबतच प्रतिमा ठेवून तिची मिरवणूक काढली जाते. मंड्या जिल्ह्यातही मालवल्ली येथे एक रावणमंदिर आहे.

ravan1
जोधपूर येथील चांदपोल येथेही रावणमंदिर आहे. हे स्थान मंदोदरी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. रावण व मंदोदरीचे हे विवाहस्थळ मानले जाते. येथे रावणची छतरी आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात वैजनाथ कस्बा येथे रावणाचा पुतळा जाळणे हे महापाप समजले जाते. येथेच रावणाने कांही काळ वैजनाथ महादेवापुढे कडक तप करून मोक्ष मिळविला होता असा समज आहे.

उत्तरप्रदेशातील कानपूरमधील रावणमंदिर तर जगप्रसिद्ध आहे. येथे हे दशानन मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे शक्ती व भक्तीचे प्रतीक म्हणून रावणपूजा केली जाते.१८९० मध्ये हे मंदिर बांधले गेले असून ते फक्त वर्षातून एक दिवस म्हणजे दसर्‍याच्या दिवशी उघडले जाते. या मंदिरातही लोक नवस बोलतात व इच्छा पूर्ण झाली की हा नवस देवळात तेल जाळून फेडला जातो.

Leave a Comment