आपोआप दुरूस्त होणार्‍या रस्त्यांचा प्रयोग यशस्वी

raste
भारतातील रस्ते या विषयावर बोलण्यासारखे व न बोलण्यासारखेही खूप आहे. भारतीय रस्त्यांची दैन्यावस्था यावर अनेकांना पीएचडीही मिळू शकेल. मात्र भारतीय रस्त्यांची ही उखडेल स्थिती कदाचित इतिहासजमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे व त्याला कारण बनले आहेत मूळचे भारतीय पण गेली ३५ वर्षे कॅनडात स्थायिक असलेले प्रोफेसर नेमकुमार बनाथिया. ते युनिव्हर्सिटी ऑफ कोलांबियात रस्ते याच विषयावर सातत्याने संशोधन करत आहेत. बनाथिया यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानांमुळे हे रस्ते कमी खर्चात व जलद बांधून होतात.

बनाथिया यांनी बंगलोर जवळच्या एका गावात हा प्रकल्प राबविला आहे. ते कॅनडा व इंडिया रिसर्च सेंटर ऑफ एक्सलन्सचे सायंटिफिक डायरेक्टर आहेत व त्यांनी विकसित केलेल्या तंत्रानुसार या गावातील रस्ते बनविले गेले आहेत. हे रस्ते उखडले गेले तरी आपोआप दुरूस्त होतात. विशेष म्हणजे हे रस्ते बांधताना नेहमी रस्ता बांधकामासाठी लागणार्‍या सिमेंटचे प्रमाण ६० टक्के कमी होते, परिणामी रस्ते बांधण्यासाठी येणारा खर्चही कमी होतो व किमान १५ वर्षे हे रस्ते सुस्थितीत राहतात. प्रो.बनाथिया यांनी हायड्रोफिलिक नॅनो कोटिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे रस्ते तयार केले असून त्यात राखेचा वापर केला गेला आहे. हे रस्ते पाणी शोषून घेतात व सतत कोरडे राहतात त्यामुळे ते अधिक काळ टिकतात.

बंगलोर जवळच्या गावात बांधले गेलेले हे रस्ते गेले वर्षभर सर्व ऋतूत उत्तम स्थितीत राहिले आहेत. त्यामुळे आता हा प्रयोग कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र व हरियाणा येथेही केला जाणार आहे. प्रो.बनाथिया मुळचे नागपूरचे आहेत.

Leave a Comment