या देवीला नवसफेडीसाठी वाहले जातात जोडे

shoes
भारतात कोणत्याही मंदिर, देवळात प्रवेश करण्यापूर्वी पायातील जोडे मंदिराबाहेर काढण्याची प्रथा आहे. मात्र भारतात एक दुर्गा मंदिर असेही आहे जेथे बोललेला नवस पूर्ण झाला की देवीच्या चरणांशी नव्या चपला, जोडे वाहून नवसाची पूर्तता केली जाते. ही अनोखी परंपरा भोपाळ जवळ असलेल्या कोलार भागातील दुर्गा मंदिरात पाळली जाते. हे मंदिर जीजीबाई मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे.

हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे व ते केवळ १८ वर्षांपूर्वी स्थापन केले गेले आहे. ओमप्रकाश महाराज यांनी या मंदिरात मूर्ती स्थापना करताना शिवपार्वती विवाह समारंभही केला होता. त्यावेळी पार्वती म्हणजे दुर्गेचे कन्यादानही त्यांनीच केले होते. दुर्गेला ते आपली मुलगी मानून तिची सेवा करतात व तिचे मुलीसारखेच कोडकौतुकही करतात. या मंदिरात दुर्गेपुढे बोललेली इच्छा हमखास पूर्ण होते अशी ख्याती असून येथे देशातूनच नव्हे तर विदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

विदेशातून आलेल्या भाविकांची इच्छा पूर्ण झाली तर नवस फेडीसाठी ते परदेशातून जोडे पाठवितात असेही समजते. कांही भाविक तर उन्हाळ्यात चपलांबरोबर चष्मा, टोपी, घड्याळही देवीला अर्पण करतात. अर्पण करण्यात आलेल्या चपला व अन्य वस्तू १ दिवस देवीच्या पायाशी ठेवल्या जातात व नंतर त्यांचे प्रसाद म्हणून वितरण केले जाते.

Leave a Comment