लवकरच ट्रायंफच्या १० लाख किमतीच्या बाईकचे लाँचिंग

bike
मुंबई: ट्रायंफने आपली नवी बाईक ‘बॉनव्हील टी१००’ हे मॉडेल नव्याने बाजारात आणले आहे. अनेक रायडर्सची ‘बॉनव्हील’ ही बाईक ‘ड्रीम बाईक’ असून ट्रायंफच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत बॉनव्हीलची लोकप्रियता प्रचंड आहे. रॉयल एनफिल्डच्या बुलेट ५०० सारखी साधी सरळ रचना आहे.

ट्रायंफने ‘बॉनव्हील टी१००’ ही गाडी संपूर्णपणे नव्याने जन्माला न घालता ‘बॉनव्हील’च्या दोन आधीच्या मॉडेल्समधल्या सर्वोत्तम गोष्टी घेऊन बनवली आहे. म्हणजेच या गाडीचे इंजिन हे ‘बॉनव्हील स्ट्रीट ट्वीन’ या बाईकचे आहे तर चेसीस आणि बॉडी स्ट्रक्चर हे ‘बॉनव्हील टी १२०’ या बाईकमधून उचलले आहे.

‘बॉनव्हील स्ट्रीट ट्वीन’ या गाडीचे ९००cc क्षमतेचे इंजिन कोणत्याही आणि कसल्याही रस्त्यांवर सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी पुरेस आहे. ‘बॉनव्हील टी१२०’ या बाईकचे देखणे रुप साऱ्यांनाच आकर्षित करुन घेत आहे. त्यात आणखी भर टाकत ‘बॉनव्हील टी १००’ आकारला आली आहे. त्यामुळे दिसणे आणि असणे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी ग्राहकांना देण्याचा कंपनीचा हेतू ‘बॉनव्हील टी-१००’ च्या निमित्ताने पूर्ण झाला आहे.

ट्रायंफने ही बाईक पहिल्यांदा जर्मनीतल्या इंटरमोट मोटरसायकल ट्रेड शोमध्ये सादर केली. भारतात ही गाडी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात या गाडीची अंदाजे किंमत असेल सुमारे १० लाख रुपये. भारतात सध्या या श्रेणीतली सगळ्यात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे बुलेट. जिची किंमत जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. किमतीमधल्या या फरकामुळेच ‘बोनव्हील’ ही चाहत्यांची फक्त ‘ड्रीम’ बाईकच बनून राहिली आहे. आता ‘बोनव्हील टी१०० ’ या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

Leave a Comment