रेल्वे प्रवाशांवर ‘प्रभू कृपा’; एक पैशांत मिळणार १० लाखांचा विमा

indian-rail
नवी दिल्ली – खास दसरा, दिवाळी निमित्त आजपासून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक पैशांत १० लाखांचा प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना वैकल्पिक यात्रा विमा योजनेअंतर्गत यासाठी ९२ पैसे द्यावे लागत होते. प्रवाशांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे तात्पुरत्या स्वरूपात ९२ पैशांऐवजी एक पैसा प्रीमियम करण्यात आले आहे. एक पैशांत ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व तिकिटांवर विमा काढता येईल.

आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. मनोचा यांनी प्रवाशांना रेल्वेकडून ही दिवाळीची भेट असल्याचे सांगितले. आमचा वैकल्पिक विम्याच्या प्रीमियमची रक्कम कमी करण्यावर विचार सुरू असून याची अंमलबजावणी लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेचा आतापर्यंत १,२०,८७,६२५ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. ही योजना एक सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली होती. २९ सप्टेंबरपर्यंत एक कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकिट काढल्यानंतर १० लाखांपर्यंत विमा मिळत होता. हा अपघाती विमा असून मृत्यू झाल्यानंतर १० लाख रूपये तर अपंगत्व आल्यास ७.५ लाख रूपये कुटुंबीयांना मिळतात.

Leave a Comment