दिवाळीत धावणार मध्य रेल्वेच्या ९२ विशेष गाड्या

indian-railway
मुंबई: मध्य रेल्वेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ९२ विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-जम्मूतावी, मुंबई-वाराणसी, मुंबई-गया, मुंबई-हाटिया, दादर-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे. यातील ४८ गाड्या कोकण मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

२१ ते ३० ऑक्टोबरदरम्यान रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादर-सावंतवाडी (०११३) ही गाडी चालवण्यात येणार असून या गाडीच्या १० फेऱ्या असतील. ही गाडी दादरहून स. ७.५० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ०११४ सावंतवाडी-दादर गाडी सोमवार, बुधवार, शनिवारी सावंतवाडीहून स. ६.४० वा. सुटून त्याच दिवशी सायं. ४.३० वाजता दादरला पोहोचेल.

दादर-सावंतवाडी (०१०९५/९६) ही गाडी १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. तिच्या २६ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. ०१०९५ ही दादर-सावंतवाडी गाडी रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादरहून स. ७.५० वाजता सुटून त्याच दिवशी सावंतवाडी येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. ०१०९६ सावंतवाडी-दादर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीतून स. ५.३० वाजता सुटून त्याच दिवशी दु. ३.५० वाजता दादरला पोहोचेल.

त्याचप्रमाणे दादर-रत्नागिरी ०१०८९/९० गाडी दर शुक्रवारी चालवण्यात येईल. तिच्या चार फेऱ्या होतील. ०१०८९ ही दादर-रत्नागिरी गाडी २१ ते २८ ऑक्टोबरमध्ये दादरहून रा ९.४५ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी स. ६ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी निघणारी गाडी २२ ते २९ ऑक्टोबरमध्ये दर शनिवारी चालवण्यात येईल. ही गाडी स. ८.४० वाजता रत्नागिरीहून सुटून त्याच दिवशी दु. ३.५० वाजता दादरला पोहोचेल.

दादर-रत्नागिरी (०१००१) ४ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी दादरहून रात्री ९.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ५ ते २६ नोव्हेंबर या काळात प्रत्येक शनिवारी स. ७ वाजता ही गाडी सुटणार असून, ती दुपारी २.०५ वाजता दादरला पोहोचेल.

Leave a Comment