त्रिकुट पर्वतावरील मैहर शारदामाता

sharada
भारतात देवीची उपासना करणार्‍या भाविकांची संख्या खूपच मोठी आहे. मात्र बहुतेक वेळा देवीची स्थाने उंच पहाडात असतात. उत्तरेतील वैष्णोदेवी अशीच उंच पहाडांवर आहे तसेच मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात त्रिकूट पर्वतावर असेच एक देवीचे स्थान आहे. त्याला मैहर शारदामाता म्हणून ओळखले जाते. भारतातील हे एकमेव शारदा मंदिर असल्याचे सांगितले जाते. मैहर याचा अर्थ आहे आईचा हार. म्हणजे देवीचा हार. सतीमातेचा यज्ञात जळालेला देह घेऊन महादेव तांडव करत असताना तिच्या गळ्यातील हार जेथे पडला ते हे स्थान असल्याचे मानले जाते मात्र हे सतीच्या ५२ शक्तीपीठातील स्थान नाही.

या मंदिरात काल भैरवी, हनुमान, देवी काली, दुर्गा, गौरीशंकर, शेष नाग, फलमती माता, ब्रह्मा, जलापा देवी अशा अनेक मूर्तीही आहेत. असे सांगतात की पृथ्वीराज चौहान युद्धात लढलेले आल्हा व उदल या देवीचे भक्त होते व त्यांनीच प्रथम जंगलात पहाडावर लपलेले हे मंदिर उजेडात आणले. आल्हाने येथे मोठी तपस्या केली व त्याला मातेने अमरत्वाचा आशीर्वाद दिला. त्यानेच देवीचे नामकरण शारदामाई असे केले. आजही या मंदिरात सर्वप्रथम आल्हा व उदल हे दर्शन घेतात असे मानले जाते. याच पहाडावर एक तलाव असून त्याला आल्हा तलाव असे म्हटले जाते.

मंदिरात जाण्यासाठी हजारांवर पायर्‍या चढाव्या लागतात. मात्र तरीही येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. आदि शंकराचार्यांची ९ व १० व्या शतकात येथे सर्वप्रथम पूजा केल्याचे सांगितले जाते. देवीच्या मूर्तीची स्थापना विक्रम संवत ५५९ मध्ये केली गेली आहे. येथे देवनागरी भाषेतील एक शिलालेख ही आहे. येथेही देवीला पशुबळी देण्याची प्रथा होती मात्र १९२२ मध्ये ती प्रथा बंद केली गेली.