पाकिस्तानातून अशा प्रकारे भारतात येतात बनावट नोटा

nakali
दिल्ली स्पेशल पोलिसांनी बनावट नोटांचा कारभार करणार्‍या संघटीत गटाचा पर्दाफाश नुकताच केला असून ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या घटनेत दोन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. राष्ट्रीय गुप्तचर संस्थेने अशा बनावट नोटा कुठून, कशा व कशासाठी येतात यासंदर्भात कांही माहिती दिली आहे.

गुप्तचर संस्थेच्या म्हणण्यानुसार भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी व या नोटांच्या व्यवहारातून मिळालेल्या पैशांतून भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी पैसा पुरविता यावा म्हणून असे बनावट चलन पाकिस्तानातून भारतात पाठविले जाते. पाकिस्तानची आयएसआय, दाऊद गँगच्या माध्यमातून हा कारभार करते. या नोटा बनविण्यासाठी लागणारा विशेष कागद पाकिस्तानात आयात केला जातो. बनावट नोटा सिक्युरिटी फिचर्ससह तयार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी लागते ती पाकिस्तानकडे आहे.

नेपाळ, बांग्लादेश, चीन, थायलंड, मलेशिया, श्रीलंका, हाँगकाँग अशा अनेक देशात पाकिस्तानचे जाळे असून त्यांच्या मार्फत या नोटा प्रथम त्या देशात पाठविल्या जातात व तेथून भारतात आणल्या जातात. भारतात दाऊद गँगचे नेटवर्क जबरदस्त आहे व त्याचा वापर भारतात नोटा आणण्यासाठी केला जातो. दरवर्षी या प्रकारे १ हजार कोटींच्या बनावट नोटा भारतात येतात. दाऊद गँगमधील अफताब भटकी व हाजी अब्दुला भारतात या नोटा चलनात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. नोटांच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी हल्ले करण्यासाठी मदत म्हणून पुरविला जातो. भारतीय पोलिसांनी लष्करे तैयबा व डी कंपनीतील कांही जणांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून अशा बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आहेत.

Leave a Comment