फक्त एका क्लिकवर रेल्वेच्या सर्व सुविधा शक्य

railway
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुखकारक आणि आरामदायी करण्यासाठी आपल्या मोबाईल अॅपमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता अॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातील सर्व सुविधा मिळणे सहज शक्य होणार आहे.

याबाबत रेल्वे विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवाशांसाठी आम्ही रेल्वेच्या सर्व सुविधा एकत्रित करुन अॅपलिकेशन विकसित करत आहोत. या अॅपमध्ये प्रवाशांच्या सर्व गरजांची काळजी घेतली जाईल. तसेच याच्या माध्यमातून तुम्ही तिकीट बुकिंगपासून ते टॅक्सीचे आरक्षण आणि जेवणाची ऑर्डरही देऊ शकाल. या अॅपवरुन इतरही रेल्वे सम्बंधित अनेक कामे करणे शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, रेल्वे प्रवासानंतर कुली सर्व्हिस, आरामासाठी एखादी रुमचे बुकिंग, रेल्वे डब्यातील स्वच्छतेच्या तक्रारी, डिजिटल एंटरटेनमेंट, रेल्वे आरक्षण वेटिंगमध्ये असतानाही विमान तिकीटाचे बुकिंग करणे, अशा विविध सुविधा या अॅपमध्ये देण्यात येणार आहेत.

रेल्वेच्या डिजिटल क्रांतीसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे स्विकारल्यापासून अनेक निर्णय घेतले आहेत. यामुळे रेल्वेचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यात मदत मिळाली आहे. रेल्वेने ट्विटरच्या माध्यमातूनही पुढाकार घेऊन आपल्या कार्यप्रणालीत अनेक बदल घडवून आणले. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये सहकार्य वाढीस लागले आहे. सुरेश प्रभूंनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रवासातील प्रवाशांना भोगाव्या लागणाऱ्या समस्यांचे तातडीने दखल घेऊन निवारण केले आहे.

Leave a Comment