छत्रपतींच्या प्रतापगडावरील भवानीमातेचे प्रसिद्ध मंदिर मशालींच्या प्रकाशात लकाकले

pratapgad
सातारा – ३५६ मशालींच्या प्रकाशाने शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड उजळून निघाला. ३५० वर्षे या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला पूर्ण झाल्यानंतर नवरात्रौत्सवात चतुर्थीच्या दिवशी येथे मशाली पेटवल्या जाऊ लागल्या. ही परंपरा गेली सहा वर्षे येथे सुरू असून रात्रीचा प्रतापगडावरील सोहळा पाहण्यास हजारो शिवभक्तांनी राज्यभरातून गर्दी केली होती.

कितीतरी ऐतिहासिक घटनांचा सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला साक्षीदार आहे. या किल्ल्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम जोडले गेले आहेत. नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून शिवाजी महाराजांनी गडावर तिची स्थापना केली. २०११ मध्ये या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविण्यात आल्या. आता प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये एका मशालीची वाढ होते आहे. नवरात्रातील चतुर्थीच्या दिवशी मशाली पेटविण्याची ही परंपरा सुरु होवून ६ वर्ष झाली. तरी, हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावत आहेत.

Leave a Comment