एचआयव्ही विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

hiv
नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एचआयव्ही आणि एडस विधेयक २०१४ मधील सुधारणांना मंजुरी देण्यात असून एचआयव्ही आणि एडसबाधित रूग्णांना या निर्णयामुळे कायदेशीररित्या अँटी रेट्रोव्हायरल उपचार घेण्याचा हक्क मिळाला आहे.

नव्या विधेयकानुसार केंद्र आणि राज्य सरकारला एआरटी सेंटर (अँटी रेट्रोव्हायरल थेरपी) आणि संधीसाधू संक्रमण व्यवस्थापन सुविधा पुरवणे बंधनकारक राहील. तसेच एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा प्रांतिक किंवा वैयक्तिक भेदभाव करता येणार नाही. संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) काळात हे विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात संसदेच्या स्थायी समितीने यामधील त्रुटी दूर करण्यासाठी हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे पाठवले होते.

दरम्यान, आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्यही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. यामध्ये भारत आणि युरोपियन महासंघातील सामंजस्य करार आणि आफ्रिकन आशियाई ग्रामीण विकास संघटनेशी करण्यात आलेल्या पाणी सहकार्य कराराचा समावेश आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment