बस्तर मधली दंतेश्वरी देवी व दसरा रथोत्सव

dantesh
छत्तीसगढचा बस्तर जिल्हा आदिवासी तसेच नक्षली इलाका म्हणून प्रसिद्ध असला तरी येथे साजरा होणारा दसरा हे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. बहुतेक ठिकाणी दसरा म्हणजे रामलिला व रावणदहन असा कार्यक्रम असतो मात्र बस्तरमधील दसरा पूर्णपणे वेगळा आहे. येथे रामरावणाचा कांहीही संबंध नाही तर या दिवशी येथील देवता दंतेश्वरीचा रथोत्सव केला जातो. माँ दंतेश्वरी व अन्य अनेक देवतांच्या पूजनानंतर सुरू होणार्‍या या रथोत्सवासाठी बनविला जाणारा लाकडाचा दुमजली रथ हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. हा विशालकाय लाकडी रथ आदिवासीच बनवितात व तो आदिवासींकडूनच ओढला जातो. आस्था, भक्तीचे प्रतीक असलेल्या दंतेश्वरी मातेचे हे छत्र आहे असे समजले जाते.

bastar
अगदी अलिकडेपर्यंत येथे आदिवासी राजा होता. रथोत्सवात तोही रथावर विराजमान होत असे. विशेष म्हणजे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान व हत्यारे न वापरता ठराविक काळात या विशाल रथाची निर्मिती परंपरेनुसार केली जाते. काष्ठ कलेचा हा सर्वोत्तम नमुना असतो तसेच या निर्मितीमुळे आदिवासीतील सहकाराच्या भावनेचेही दर्शन घडत असते. सर्व जाती वर्ग या उत्सवात समान मानले जातात. या उत्सवाची सुरवात श्रावण आमावस्येपासूनच होते व पुढील ७५ दिवस हा सोहळा सुरू असतो. जगात इतक्या मेाठ्या कालावधीपर्यंत चालणारा हा एकच उत्सव आहे. गेली ६०० वर्षे तो साजरा होत असल्याचे पुरावे मिळतात.

mandir
काकतीय राजवंशाने या उत्सवाची सुरवात केल्याचे समजले जाते. प्रथम रथासाठी जंगलातले लाकूड विधीवत कापून गावात आणले जाते व ते जमिनीत पुरले जाते. त्यानंतर स्तंभारोहण केले जाते याला पाटजत्रा असे म्हणतात. त्यानंतर विभिन्न गावातून लाकडे कापून आणली जातात व त्यातून या दुमजली रथाची निर्मिती केली जाते. या काळात अनेक उत्सव साजरे होत असतात. काझनगुडी येथे हरिजन कन्येला झोपळ्यात बसवून तिच्याकडून उत्सवासाठी अनुमती व सहमती घेतली जाते. हे दहा दिवस योगी साधनामग्न असतात असेही सांगतात. उत्सवाची संागता तुरीया दरबाराने केली जाते.

Leave a Comment