टोयोटोने सादर केला ह्युमनाईज्ड रोबो किर्बो

kirbo
जपानच्या टोयोटा मोटर्स कार्पोरेशनने देशातील अपत्यहीन जोडप्यांसाठी तळहातात मावेल असा हयुमनाईज्ड रोबो सादर केला असून त्याचे नामाकरण किर्बो असे केले गेले आहे. हा रोबो आर्टिफिशियल किडस स्पर्धेसाठी तयार केला गेला होता. टोयोटोच्या नॉन ऑटो व्हेचंरने हा रोबो तयार केला आहे. माणसांत भावनात्मक बंध वाढावेत यासाठी हा रोबो उपयुक्त ठरेल असा कंपनीचा विश्वास आहे.

लहान मुलांची उणीव भरून काढणारा हा रोबो डोळे मिचकावतो, लहान मुलासारखाच उंच आवाजात बोलतो. पुढच्या वर्षीपासून तो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्याची किंमत आहे ३९२ डॉलर्स म्हणजे २६ हजार रूपये. टोयोटोने या रोबोच्या निर्मितीसाठी बेबी ऑटोमेशन करणार्‍या अनेक कंपन्यांचे सहकार्य घेतले आहे.

जपान हा जगातील सर्वाधिक वृद्ध असलेला देश बनला आहे. येथील जन्मदर खूपच घसरला असून अनेक प्रयत्नांनंतरही तो वाढत नसल्याचे दिसून आले आहे. जपानच्या लोकसंख्येत सध्या १/४ नागरिक हे ६५ वर्षांपुढचे आहेत तसेच प्रत्येक दहा महिलांमागे १ अविवाहित महिला आहे. लग्न झालेली जोडपी करियर व कामाच्या रेट्यामुळे मुले जन्मास घालण्यास उत्सुक नसतात यामुळे युद्ध, दुष्काळ, आजार अशा आपदा ओढवल्या तर जपानची लोकसंख्या आणखीनच कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वृद्धांची वाढती संख्या ही सरकारवर बोजा बनली आहे. या रोबोमुळे जोडप्यांच्या मनात मुलांबद्दल प्रेमभावना निर्माण होईल व ते मुले जन्मास घालण्याचा विचार करण्यास प्रवृत्त होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment