सेनाप्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठाखाली का?

dalbirising
उरी हल्ल्याला चोख उत्तर दिल्यामुळे भारतीय सेनेबाबतचा अभिमान देशवासियांच्या बोलण्या वागण्यातून प्रतीत होत आहे. भारतीय सेनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग हेही आजकाल लोकांच्या कौतुकाचा विषय झाले आहेत. थोडे बारकाईने पाहिले असले तर असे दिसते की आपल्या सेनाप्रमुखांच्या गणवेशातील हॅटचा पट्टा नेहमीप्रमाणे हनुवटीखाली नाही तर खालच्या ओठाच्या खाली बांधलेला दिसतो. असे का असा प्रश्न कधी मनात आला आहे? आला असेल तर त्याचे उत्तर येथे मिळेल.

भारतीय सेनेचा प्रत्येक जवान पूर्ण सेनेच्या तोडीचा असल्याची भावना भारतवासियांत बळावते आहे. हिमालयाएवढे मनोबल व सिंहासारखा पराक्रम गाजविणार्‍या भारतीय सेनेत अनेक रेजिमेंट असल्या तरी सर्वांचे ध्येय एकच आहे व ते म्हणजे देश व देशवासियांचे रक्षण. या रेजिमेंटमधील एक आहे गुरखा रेजिमेंट. वेगवान, कुशल व घातक हल्यांसाठी ही रेजिमेंट जगात प्रसिद्ध आहे. या रेजिमेंटमध्ये हॅटचा पट्टा खालच्या ओठाखाली बांधला जातो व आपले सेनाप्रमुख दलबीरसिंग सुहाग हे १९७० मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण संपवून १९७४ मध्ये प्रथम ४/५ गुरखा रायफल्स रेजिमेंटमध्ये कमिशण्ड झाले आहेत.

dalbir
हॅटचा पट्टा असा बांधण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात त्यातील कांही मजेदार आहेत. असे सांगतात गुरखा रेजिमेंट मध्ये प्रामुख्याने पहाडी लोकांचा भरणा आहे व हे लोक वंशपरंपरेने उंचीने कमी असतात. अन्य सैनिकांच्या तुलनेत त्यांची उंची जास्त कमी भासते. अशावेळी अन्य जवानांबरोबरच उंच दिसावे म्हणून हा पट्टा हनुवटीऐवजी ओठाखाली बांधण्याची प्रथा सुरू झाली व ही प्रथा त्यांना ब्रिटीशांकडून विरासतीत मिळाली.

एक मजेदार कारण असे सांगितले जाते की जोशात येऊन दुश्मनावर हल्ला करताना या रेजिमेंटचे जवान जोरजोरात ओरडा करतात त्यामुळे शत्रू सावध होण्याची भीती असते. ओठाखाली हॅटचा पट्टा आल्याने त्यांचे तोंड बंद राहते. असेही म्हणतात की मागच्या बाजूने शत्रूने सैनिकावर हल्ला केला तर अनेकदा ते हॅटचा पट्टा ओढून सैनिकाचा गळा घोटू शकतात हा पट्टा छोटाच असल्याने शत्रूला गळा घोटायची संधी मिळत नाही. असेही सांगतात की कांही वेळा शत्रू सैनिकांची टोपी मागून खेचून त्यांना पाठीवर पाडतात पण येथे हा पट्टा छोटा असल्याने टोपी मागे खेचली गेली तर टोपी पडते पण सैनिक पाठीवर पडत नाहीत.

अर्थात गुरखा रेजिमेंट शरीरयष्टीने छोटी असली तरी दुश्मनाशी दोन हात करताना शौर्यात ते अजिबात कमी नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Comment