फेसबुकचे ‘मार्केटप्लेस’ फीचर लॉन्च

facebook
मुंबई : आता खऱ्या अर्थाने ‘मार्केट’मध्ये सोशल मीडिया जायंट फेसबुकने एन्ट्री घेतली असून आतापर्यंत शब्दांची, भावनांची, आठवणींची देवाण-घेवाण करणारे फेसबुक आता वस्तूंची सुद्धा देवाण-घेवाण करणार आहे. फेसबुकने यासाठी ऑनलाईन ‘मार्केटप्लेस’ची सुरुवात केली असून, या माध्यमातून यूझर्स आपापल्या वस्तूंची एकमेकांमध्ये खरेदी-विक्री करु शकतात.

फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन यांसारख्या प्रस्थापित ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सना फेसबुकच्या ‘मार्केटप्लेस’ या ऑनलाईन खरेदी-विक्री प्लॅटफॉर्ममुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. कारण फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या जगभरात अब्जावधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे, या ‘मार्केटप्लेस’च्या माध्यमातून फेसबुक ‘इबे’सारखी सुविधाही उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती मिळते आहे.

फेसबुकने एका पोस्टच्या माध्यमातून ‘मार्केटप्लेस’ची माहिती दिली. याबाबत फेसबुकने म्हटले आहे की, मार्केटप्लेस या फीचरला कंपनी औपचारिकरित्या रिलीज करत आहे. खरंतर फेसबुकच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी-विक्री अनेक वर्षांपासून होते आहे. मात्र, आता फेसबुकने एका फीचरद्वारे ते नव्याने आणले आहे. फेसबुकचे प्रॉडक्ट मॅनेजर केरी कू यांनी याबाबत सांगितले की, मार्केटप्लेस सुरु केल्यानंतर तुफान प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्येक महिन्याकाठी ४५ कोटींहून अधिक लोक या फीचरचा उपयोग करुन देवाण-घेवाण करत आहेत.

Leave a Comment