संसदेच्या कँटीनमध्ये पुन्हा दरवाढ?

canteen
दिल्ली- देशात महागाईच्या चटक्यांमुळे आम जनता होरपळत आहे हे लक्षात घेऊन संसदेत खासदारांसाठी चालविल्या जात असलेल्या कँटिनमधील पदार्थांचे भाव वाढविण्याबाबत सरकार विचार करत असून त्यासाठी जितेंद्र रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यांची समिती नेमली गेली असल्याचे समजते. या जानेवारीत कँटिनमधील पदार्थांचे दर सहा वर्षात प्रथमच वाढविले गेले होते त्यानंतर ते आता पुन्हा वाढविण्यासंदर्भात ही समिती अहवाल देणार आहे.

देशभरातील सर्वसामान्य जनता जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईमुळे पुरेसे जेवण घेऊ शकत नाही मात्र संसदेतील खासदार व अन्य प्रतिनिधींना संसदेतील उपहारगृहात अत्यंत स्वस्तात चांगले जेवण व पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी सबसिडीची तरतूद आहे. मात्र बाजारात महागाई असताना खासदार घेत असलेल्या स्वस्तातील जेवणाबाबत चोहोबाजूंनी सरकारवर टीका होत आहे त्यामुळे दरवाढीचा विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. व यापुढेही वेळोवेळी या दरांची पडताळणी करून ते वाढविण्याबाबत विचार केला जाणार आहे सध्या या कँटिनमध्ये शाकाहारी जेवण ३० रूपये, मासांहारी जेवण ६० रूपयांत उपलब्ध आहे. जानेवारीपूर्वी हेच दर अनुक्रमे १८ व ३३ रूपये होते.

Leave a Comment