सायबर सुरक्षा: भारत, अमेरिका सहकार्य वाढविणार

cyber-security
नवी दिल्ली: सायबर सुरक्षा क्षेत्रात भारत आणि अमेरिका या देशांनी एकमेकांशी अधिक प्रभावी आणि दूरगामी सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर सुरक्षेबाबत दोन्ही देशांच्या ५ व्या परिषदेमध्ये प्रतिनिधींनी याबाबत सविस्तर चर्चा केली.

आंतरराष्ट्रीय सायबर धोरणांबाबत माहितीची देवाणघेवाण, परस्पर चर्चा, सायबर गुन्हेगारीला तोंद्देण्यासाठीचे प्रयत्न, सायबर हल्ल्यांना निष्प्रभ करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेचे विकसन या विषयांमध्ये भारत आणि अमेरिका एकमेकांना सहकार्य करून सायबर सुरक्षा आणि डिजिटल अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील; अशी ग्वाही संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या चर्चेद्वारे सायबर कायद्यांची अंमलबजावणी, सायबर धोक्यांबाबत माहितीची देवाणघेवाण या क्षेत्रात द्विस्तरीय सहकार्याला गती मिळणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. एकमेकांची सायबर क्षमता वाढविणे, सुरक्षा विषयक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, इंटरनेट वापरातील खुलेपणा, सायबर सुरक्षेसाठी चाचण्या आणि कसोट्या विकसित करणे; या बाबतीत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

Leave a Comment