कात्यायनी मातेचे शक्तीपीठ छत्तरपूर

chhatar
दिल्ली जवळ गुरगांव मेहरोली रोड वर असलेले छत्तरपूर मंदिर हे विख्यात कात्यायनी मातेचे शक्तीपीठ आहे. नवरात्राच्या दिवसांत येथे दररोज किमान १ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. या सर्व काळात मंदिरात भजन, पूजन, हवन अशी मातेची उपासना सुरू असते. १९७४ साली या मंदिराचा जीर्णोध्दार संत नागपाल यांनी केला. ७० एकराचा परिसरात पसरलेल्या या भव्य मंदिरात माता दुर्गेच्या तीन मोठ्या मूर्ती असून त्या अष्टधातूंपासून बनविल्या गेलेले आहेत.

असे सांगतात की संत नागपाल यांच्या आईवडीलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांना १० मार्च १९२५ रोजी कर्नाटकातून एका महिलेने छतरपूर येथील दुर्गाश्रमात आणले. तेव्हापासून नागपाल यांनी दुर्गा मातेलाच आपली आई मानून तिची सेवा सुरू केली. या मंदिराच्या पहिल्या भागात तळात शिवमंदिर आहे. त्यानंतर जिन्याने वर गेले की राम दरबार आहे. येथेच राधाकृष्ण, कृष्ण बलराम, माता यशोदा यांच्याही मूर्ती आहेत. त्यापुढेच दुर्गेची मूर्ती आहे. येथे एका मंदिरातून दुसर्‍या मंदिरात जाताना बाहेर येण्याची गरज नाही कारण सर्व मंदिरे आतूनच जोडली गेली आहेत.

murti
महिषासूर मर्दिनीच्या मंदिरात एक झोपाळा असून त्यावर मातेच्या पादुका ठेवल्या गेल्या आहेत. येथे दुर्गेची भव्य मूर्तीही आहे. गणेश, सरस्वती, कार्तिकेय यांच्याही मूर्ती येथे पहायला मिळतात. तसेच ११० फूट उंचीची भव्य हनुमान मूर्ती हेही येथील आकर्षण आहे. येथेच श्रीयंत्रावर ६० फूट उंचीचा त्रिशूलही आहे आणि हे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे.

Leave a Comment