सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड अजित दोभाल

dobhal
पाकसीमा पार करून भारतीय लष्कराच्या कमांडोनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची चर्चा जगभरात सुरू झाली आहे. या सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड असलेले व भारतीय जेम्स बाँड अशी ओळख मिळविलेले अजित डोभाल यांचा परिचय या निमित्ताने झाला आहे. पंतप्रधान मोदींनी पाकला जशास तसे उत्तर दिल्याची भावना भारतीयांच्या मनात दाटून आली आहे मात्र या कारवाईची सारी आखणी ज्यांच्या मेंदूत शिजली ते होते अजित डोभाल.

मूळच्या उत्तराखंड गढवालचे असलेले अजित डोभाल यांचे शालेय शिक्षण अजमेरच्या लष्करी शाळेत झाले असून त्यानंतर त्यांनी आग्रा येथून एम.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर यूपीएससी परिक्षेत ते केरळ केडर मधून आयपीएस झाले.१९७२ साली त्यांनी भारतीय गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो येथे काम करायला सुरवात केली. भारतीय उच्चायोगात सहा वर्षे ते पाकिस्तानात काम करत होतेच पण त्यांच्या पाकिस्तानातील कामाची सुरवात एजंट म्हणून झाली होती. सात वर्षे त्यांनी हे काम केले तेव्हा ते लाहोर येथे मुस्लीम बनून राहिले होते.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्येही त्यांनी हेर म्हणून कामगिरी बजावली. ते पाकिस्तानी हेर बनून खलिस्तानवाद्यांसोबत राहिले व त्यांच्या काय योजना आहेत ही सर्व माहिती त्यांनी सुरक्षा दलाला दिली. त्यामुळेच ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी होऊ शकले. पाकिस्तान्यांना अजित डोभाल यांची इतकी धास्ती आहे की पाकिस्तानात कांहीही घडले तरी तेथील सुरक्षा तज्ञ डोभाल यांच्यावर आरोप करत सुटतात.

सर्जिकल स्ट्राईकबरोबरच डोभाल यांनी दाऊद इब्राहिम ऑपरेशनचा प्लॅनही तयार केला असल्याचे कांही सूत्रांकडून समजते. दाऊद पाकिस्तानात आहे व तो सध्या सारख्या जागा बदलतो आहे. सध्या तेा चमन येथे असल्याची माहिती मिळाली आहे.रॉचे एजंट त्याच्यावर सतत नजर ठेवून आहेत असेही समजते. डोभाल यांनी जून २०१० मध्ये प्रथम सीमापार भारतीय सेना पाठवून म्यानमारमधील दहशतवाद्यांना ठार करण्याची योजना यशस्वी केली होती व या कारवाईत ३० दहशतवादी ठार झाले होते.

२०१४ मध्ये इसिसच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी आणण्याच्या कामगिरीतही डोभाल यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. १९७१ ते ९९ या काळात आखले गेलेले भारतीय विमानांचे अपहरण करण्याचे पाच प्लॅन डोभाल यांच्यामुळे नाकाम बनल्याचेही सांगितले जाते. १९९९ च्या कंदहार विमान अपहरण प्रकरणातही डोभाल यांनी मुख्य संवादकाची भूमिका बजावली होती. विवेकानंद फौंडेशनची स्थापना अजित डोभाल यांनीच केली असून त्या निमित्ताने झालेल्या बैठकीतच त्यांचा व नरेंद्र मोदी यांचा पहिला परिचय झाला तेव्हा मोदी गुजराथचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मात्र या दोघांच्यात घट्ट मैत्री झाली असेही समजते.

Leave a Comment