‘बॉलपेन’च्या जनकाला गुगलचा सलाम

google
लॅडिस्लाव जोस बिरो यांनी लावलेला बॉलपेनचा शोध मानवी इतिहासात खूपच फायदेशीर ठरल्यामुळे आज त्यांच्या ११७ व्या जयंती निमित्त गुगलकडून नेहमीप्रमाणे अनोख्या पद्धतीचे डुडल बनवून त्यांना मानवंदना देण्यात आली आहे.

ज्यू पंथीय असलेल्या लॅडिस्लाव बिरो यांचा जन्म हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झाला होता. लॅडिस्लाव यांना पत्रकार म्हणून काम करत असताना वृत्तपत्रे छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाई लवकर सुकत असून त्यामुळे नंतर कागदावर कोणतेही डाग पडत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे सुरूवातीला बिरो यांनी हीच शाई फाऊंटन पेनमध्ये वापरून पाहिली. मात्र, ही शाई घट्ट असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर बिरो यांनी त्यांचे बंधू जॉर्जी यांच्याबरोबर काम करण्यास सुरूवात केली. जॉर्जी यांच्यासोबत काम करत असताना बिरो यांनी पेनामध्ये खोबणीद्वारे नियंत्रित होणाऱ्या बॉलचे तंत्र विकसित केले. हाच जगातील पहिला बॉलपेन ठरला. १९३१ मध्ये बुडापेस्ट येथील आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्यांनी हा बॉलपेन पहिल्यांदा जगासमोर आणला. १५ जुलै १९३८ ला त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले. ब्रिटन, आयर्लंड आणि इटलीत आजही या पेनाला बिरोच म्हणतात.

१९४० मध्ये जर्मनीने हंगेरीवर आक्रमण केले तेव्हा बिरो यांना देश सोडावा लागला. ते अर्जेंटिनात आले आणि पेनाचा कारखाना सुरू केला. दुसऱ्या महायुद्धात बॉल पाइंट पेनाचा वापर झाला होता.

Leave a Comment