भारत पाक सीमेवरचे तनोट माता मंदिर

tanot-mata
जैसलमेरपासून १३० किमी दूर भारत पाक सीमेवर १२०० वर्षांचे जुने तनोट माता मंदिर तेथे घडलेल्या चमत्कारांमुळे आज देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. आवड माता मंदिर या नावानेही ते ओळखले जाते. अश्विन व चैत्र नवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. बलुचिस्तानातील हिंगलाज मातेचेच हे रूप असल्याचे सांगितले जाते. हिंगलाज माता मंदिर हे देवी सतीच्या ५२ शक्तीपीठातील एक स्थान आहे.

या मंदिराचे वैशिष्ठ व महत्त्व जगापुढे आले ते १९६५ सालच्या भारत पाक युद्धानंतर. या मंदिर परिसरात पाकिस्तानने ३००० बाँबचा वर्षाव केला होता मात्र या मंदिराला त्यांच्या कोणताही उपसर्ग पोहोचला नाही. इतकेच नव्हे तर मंदिर परिसरात पडलेले ४५० हून अधिक बाँब फुटलेच नाहीत. हे बाँब आज मंदिरातील संग्रहालयात जतन करण्यात आले आहेत. या मंदिराची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे आहे व तेथे त्यांची चौकी पण आहे.

tanot-mata2
दुसरी घटना म्हणजे ४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारतावर लोंगोवालमधून आक्रमण केले ते स्थान या मंदिराजवळच आहे. पाकिस्तानी रणगाडे या ठिकाणी चाल करून आले तेव्हा लोंगोवाल चौकीवर अवघे १२० जवान होते. मात्र मातेने दिलेल्या शक्तीने सीमा सुरक्षा दल व भारतीय जवानांनी पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडवून ही भूमी रणगाड्यांचे कब्रस्तान बनवन टाकली होती. या पराक्रमानिमित्त तनोट माता मंदिरात विजयस्तंभ उभारला गेला आहे. दरवर्षी १६ डिसेंबरला तेथे शहीद जवानांच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो.

tanot-mata1
या मंदिराची कहाणी अशी सांगतात, मामडिया नावाच्या एका भाविकाच्या पोटी संतान नव्हते म्हणून त्याने हिंगलाज मातेची ७ वेळा पायी यात्रा केली व देवी मातेला माझ्या पोटी जन्म घे अशी प्रार्थना केली. त्या नंतर या कुटुंबात सात मुली व १ मुलगा जन्मला. या सातही मुली अतिशय तेजस्वी होत्या व अ्नेक चमत्कार त्या करत असत. त्यातील एकीचे नांव आवड होते. तिने हुणांचे आक्रमण झाले तेव्हा या तत्कालीन माड प्रदेशाचे संरक्षण केले. तिच्यामुळे या माड प्रदेशात बळकट रजपूत राज्य स्थापन होऊ शकले. तिने स्वतःची सदेह स्थापना करून घेतली व तेथेच राजा तुणराव भाटी याने मंदिर उभारून देवीला सुवर्णसिंहासन दिले. ८२८ साली या मंदिरात मूर्ती स्थापन केली गेली.

Leave a Comment