कलावंती दुर्ग – मृत्यूचा किल्ला

kalavanti
आज २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन. या निमित्ताने महाराष्ट्रातील मृत्यूचा किल्ला अशी ओळख मिळविलेल्या प्रभलगड अथवा कलावती दुर्गाची माहिती माझा पेपरच्या वाचकांसाठी देत आहोत. देशातील सर्वात धोकादायक किल्लयातील एक असलेला हा गड पवर्तारोहण करणार्‍यांसाठी फारच मोठे आकर्षण आहे. या गडाची मृत्यूचा किल्ला अशी ओळख या पर्वतारोहण प्रेमींवर कोणताही परिणाम करू शकलेली नाही.

माथेरान व पनवेलच्या मध्यावर असलेला हा गड म्हणजे २३०० फूट उंचीचा सरळसोट पहाड आहे. आजपर्यंत या किल्ल्यावर रोहणासाठी गेलेल्या अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तो धोकादायक गडांत समाविष्ट केला गेला आहे. गडावर जाण्याचा रस्ता अतिदुर्गम आहे व येथे जाणार्‍या पर्यटकांना सूर्यास्त होण्यापूर्वी परतावेच लागते. कारण वर वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा नाही. पहाडाची खडी चढाई पार करण्यासाठी खडकात कोरलेला पायर्‍या आहेत मात्र धरण्यासाठी रेलिंग अथवा दोर्‍या नाहीत. त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली अ्थवा पाय घसरला तर खालच्या खोल दरीतच माणूस कोसळतो. या गडावर झालेले बहुतेक मृत्यू असेच झाले आहेत.

आसपासच्या स्थानिकांच्या मते या गडाच्या आसपास आजही मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे आत्मे वावरतात. या गडाचे मुळचे नांव होते मुरंजन गड. शिवाजी राजांनी या गडाचे नांव बदलून ते कलावंती गड केले असेही सांगितले जाते. या किल्लयावर गेल्यानंतर मुंबईचा कांही भाग व आसपासचे कांही किल्ले स्पष्ट दिसतात. उत्साही लोकांना या गडावर जाण्यासाठी मे ते आक्टोबर हा काळ चांगला आहे. पावसाळ्यात मात्र ही वाट न तुडविलेलीच बरी.

Leave a Comment