मुंबई आयआयटीच्या ‘प्रथम’चे यशस्वी प्रक्षेपण

mumbai
मुंबई – तब्बल आठ वर्षे परिश्रम करून मुंबईतील आयआयतीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रथम या लघुउपग्रहाचे आज सकाळी ९ वाजता अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले. या उपग्रहाने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून झेप घेतली. विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सुरु केलेल्या योजनेतील हा सातवा उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणू मोजता येणार आहे. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान संशोधन विषयात गोडी लागावी यासाठी ‘इस्रो’ने विद्यार्थी उपग्रह योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

जुलै २००७मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.

२००९मध्ये या लघुउपग्रहाबाबत इंडियन स्पेस रिसर्चने करार केला. मात्र काही कारणास्तव या उपग्रहाच्या उड्डाणाला हिरवा कंदील मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात ‘प्रथम’मध्ये अनेक बदल करण्यात आले. सोमवारी अंतराळात उड्डाण केल्यानंतर हा लघुउपग्रह ४ महिने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. यातील २ महिन्यांत विद्यार्थी ‘प्रथम’ची अंतराळातील बाह्य चाचणी करतील. त्यातील त्रुटी टिपून नव्या प्रकल्पामध्ये बदल करण्यात येतील. हा लघुउपग्रह अंतराळात असताना भारतातील वातावरणाचा अभ्यास करेल, तसेच वातावरणातील बदल टिपेल.

आतापर्यंत ३० विद्यार्थ्यांनी या उपग्रहावर काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. देशातील १५ विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदवलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे. या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.

Leave a Comment